
नगर महापालिका क्षेत्रातील सुमारे 776 रस्त्यांच्या कामांमध्ये गुणवत्तेचे बनावट थर्ड पार्टी रिपोर्ट,टेस्ट रिपोर्ट तयार करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची ऑनलाईन तक्रार शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे केली होती.
शुक्रवारी मुंबई येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक विश्वास नांगरेंची काळे यांनी समक्ष भेट घेत पुरावा सादर केले.भ्रष्टाचाराची मोठी व्याप्ती लक्षात घेता जलदगतीने याबाबत पुढील कार्यवाही करण्याची मागणी यावेळी त्यांनी केल्याची माहिती मिळाली. माजी नगरसेवक तथा ओबीसी काँग्रेस विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे उपस्थित होते.
किरण काळे म्हणाले, “नगर शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेला निकृष्ट कामे कारणीभूत आहेत. अधिकारी, ठेकेदार आणि त्यांना पाठीशी घालणारे मनपातील काही नगरसेवक, लोकप्रतिनिधी, राजकीय पुढारी यांनी संगनमत करून बनावट गुणवत्ता प्रमाणपत्र जोडून त्या आधारे खोटी कागदपत्रे तयार करून नगर शहराला खड्ड्यात घालत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. यामुळे सर्वसामान्य नगरकर मात्र जीव मुठीत धरत रोज खड्ड्यांमधून प्रवास करत आहेत”.
विश्वास नांगरे पाटील यांनी लासलुचपत विभागाच्या नाशिक परीक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर – घारगे यांना याबाबत तात्काळ पुढील कारवाई करण्याचे आदेश दूरध्वनीद्वारे दिले आहेत. काळे यांनी देखील याबाबत दूरध्वनीवरून घारगे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती दिली आहे.