भांडी घासणारा व्यक्ती ते ‘पुरणपोळी घर’चा मालक,महिन्याला करतायत 18 कोटींची कमाई, प्रेरणादायी यशोगाथा

परिस्थिती अनुकूल नसतानाही एका व्यक्तीने संघर्ष केला आणि ”पुरणपोळी घर’ या ब्रँडची स्थापना केली. भास्कर के.आर. यांनी जीवनात अत्यंत बिकट परिस्थितीशी सामना केला आणि यश मिळवले.
एकेकाळी हॉटेलमध्ये भांडी घासणारे आणि ग्राहकांना जेवण देणारे भास्कर आज 17 आऊटलेट्सचे मालक आहेत. ते सध्या दर महिन्याला तब्बल 18 कोटी रुपयांचा व्यवसाय करतात. हार न मानण्याच्या वृत्तीने त्यांनी हे यश मिळवले आहेच. आज पुरणपोळी घर हा ब्रँड सर्वत्र लोकप्रिय झाला आहे. जाणून घेऊया प्रेरणादायी यशोगाथा.
भास्कर के.आर. यांचा जन्म 1976 मध्ये कर्नाटकच्या एका गावात झाला.भास्कर यांच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. अवघ्या चार वर्षाचे असताना त्यांनी आपले वडील गमावले. घरातील आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. आई शेतात मजुरी करत होती, त्यामुळे घर चालवणेही कठीण होते. भास्कर अभ्यासात हुशार होते, पण गरिबीमुळे त्यांना वयाच्या 10 व्या वर्षी शाळा सोडावी लागली. 12 वर्षांचे असताना ते बंगळूरला गेले आणि एका हॉटेलमध्ये काम करू लागले.
तेथे त्यांना टेबल आणि भांडी साफ करण्याचे काम मिळाले. काही काळानंतर त्यांना ग्राहकांना जेवण वाढण्याचे काम देण्यात आले. ते खूप मेहनत करत होते, कारण लहान वयातच त्यांच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या आल्या होत्या. त्यांच्या नोकरीमुळेच त्यांचे घर चालत होते.
बंगळूरमध्ये राहून भास्कर के.आर. यांनी अनेक लहान-मोठी कामे केली. त्यांनी पान दुकानही उघडले, पण ते जास्त काळ चालले नाही आणि त्यांना ते बंद करावे लागले. नंतर ते नृत्य शिकवू लागले. ते हे काम मन लावून करत होते, पण त्यातून जास्त पैसे मिळत नव्हते. त्यामुळे त्यांनी हे कामही सोडले.

23 व्या वर्षी त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला. त्यांनी आपल्या आईच्या पारंपरिक पुरणपोळीच्या रेसिपीला आपल्या जीवनाचा मार्ग बनवला. कोणतीही मोठी गुंतवणूक न करता, फक्त एक सायकल आणि एका डब्यात घरगुती पुरणपोळी घेऊन ते गल्लोगल्ली फिरू लागले. लोकांना त्यांची पुरणपोळी खूप आवडली आणि त्यांचे काम व्यवस्थित सुरू झाले. भास्कर यांच्या पुरणपोळीवर एका कुकिंग शोच्या निर्मात्यांची नजर पडली आणि त्यांना शोमध्ये संधी मिळाली. या शोमुळे त्यांना खरी ओळख मिळाली.
यानंतर त्यांनी ‘पुरणपोळी घर’ हा ब्रँड सुरू केला. भास्कर के.आर. यांचा व्यवसाय वेगाने वाढला. कर्नाटक आणि महाराष्ट्रात त्यांचे आऊटलेट्स आहेत. भास्कर दर 8 महिन्यांनी नवीन आऊटलेट उघडतात.
केवळ कर्नाटकमध्ये त्यांची 17 दुकाने आणि 10 पेक्षा जास्त फ्रँचायझी आहेत. या दुकानांमधून त्यांची दर महिन्याची विक्री सुमारे 18 कोटी रुपये आहे. आता त्यांचे आणखी दोन भागीदार जोडले गेले आहेत, जे महाराष्ट्रात त्यांचा व्यवसाय वाढवत आहेत.
भास्कर यांची कंपनी दररोज हजारो पुरणपोळ्या विकते. पूरणपोळी व्यतिरिक्त त्यांच्या आऊटलेट्समध्ये 400 हून अधिक स्नॅक्स विकले जातात.
भास्कर के.आर. यांच्या यशामुळे हे सिद्ध होते की, परिस्थिती कितीही बिकट असली तर संघर्षाने आणि जिद्दीने यशाला मिळवता येतेच.




