
शहरात 23 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. उड्डाणपुलाखाली पावसाचे पाणी साचू नये, तसेच पावसाचे पाणी साचून वाहतुकीस व नागरिकांना अडथळा होऊ नये, याकरीता इतर विभागांशी समन्वय साधून आवश्यक उपाययोजना करण्यात हयगय केल्याप्रकरणी जिल्हाधिकार्यांनी महापालिका आयुक्तांना नोटीस बजावली आहे. कर्तव्यात कसूर केल्याबाबत जबाबदारी निश्चित करून आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार कारवाई का करू नये, असा जाब विचारत दोन दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
शहरात 23 सप्टेंबर रोजी अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीमुळे शहरातील अनेक भागात पावसाचे पाणी साचले होते. स्टेशन रस्त्यावर असलेल्या उड्डाणपुलाखाली चांदणी चौक ते मार्केटयार्ड या परिसरात पावसाचे पाणी साचले असून वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याने अनेक नागरिकांनी तक्रार केली आहे.
उड्डाणपुलाखाली पावसाचे पाण्याचा निचरा होण्यासाठी बंदीस्त नाले तयार करून पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करणे आवश्यक होते. त्यानुसार योग्य त्या उपाययोजना करण्याकरिता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी समन्वय साधणे आवश्यक होते.
मात्र, यात हयगय केल्याचे निदर्शनास आले असून, आपण आपत्ती व्यवस्थापनासारख्या महत्वाच्या विषयास गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येते, असे नोटीसीत म्हटले आहे.