मुलांनी पाच दहा रुपयाचा कटलेला पतंग पकडण्यासाठी आपला अनमोल जीव धोक्यात घालू नये ..
अहमदनगर - पतंग उडवताना दक्षता घेण्याचे आवाहन..

आपल्याकडे मकर संक्रांती दरम्यान पतंग उडविण्याची प्रथा आहे. मकर संक्रांत पूर्वी साधारणतः एक महिना अगोदर पतंग उडविण्यास सुरुवात होते.
कटलेला पतंग पकडण्यासाठी धावताना विहिरीत पडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना नुकतीच नगर तालुक्यात घडली आहे.
तसेच घराच्या इमारतीच्या छतावर पतंग उडवताना भान नसल्यामुळे इमारतीवरून खाली पडून अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या वापरामुळे देखील गंभीर दुखापत होऊन अनेकांचा मृत्यू झालेला आहे. धारदार प्रतिबंधित मांजामुळे गळा, कान आदी शरीराचे भाग कापले जाणे, पक्षी – प्राण्यांच्या जीवितास धोका निर्माण होणे आदी गंभीर घटना घडलेल्या आहेत. याचबरोबर पतंग उडविण्याच्या आनंदात अनेक जण मोठ्या कर्कश आवाजात डीजे लावून जल्लोष करतांना आढळतात.
या सर्व बाबींचा विचार करता नगर शहरातील तमाम जनतेस आव्हान करण्यात येते की, पतंग उडविण्याचा आनंद घेत असताना आपल्यामुळे इतरांना इजा / अपघात होणार नाही, कर्कश आवाजाच्या डीजेमुळे आजूबाजूच्या लोकांना ध्वनी प्रदूषणाचा त्रास होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी.
पतंग उडविणाऱ्या मुलांकडे पालकांनी लक्ष ठेवावे. मुलांनी देखील कटलेला पतंग पकडण्यासाठी बेभान होऊन सैरावैरा पळू नये. पाच दहा रुपयाचा कटलेला पतंग पकडण्यासाठी आपला अनमोल जीव धोक्यात घालू नये असे आवाहन शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांनी केले आहे. शहरात कुठेही प्रतिबंधित मांजाचा वापर करतांना कोणी आढळल्यास तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी कर्कश डीजेमुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याचे निदर्शनास आल्यास अथवा तशा तक्रारी पोलीस ठाण्यात प्राप्त झाल्यास संबंधितांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याची सर्वांनी नोंद घ्यावी.