
पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नगरपंचायती, ग्रामपंचायतींच्या हद्दीत भरदिवसा पथदिवे सुरू असल्याने विजेचा मोठा अपव्यय होत आहे.
‘भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३९’नुसार विजेचा जाणीवपूर्वक अपव्यय दंडास पात्र आहे. त्यामुळे संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी पथदिव्यांचा वीजवापर योग्य वेळेतच करावा, अन्यथा विजेची उधळपट्टी करून दिवसा उजेड देणाऱ्या पथदिव्यांचा वीजपुरवठा तोडण्याचा इशारा ‘महावितरण’ने दिला आहे.
अनेक नगरपंचायती, ग्रामपंचायती पथदिव्यांच्या वीजवापराचे बिल भरत नसल्याने ‘महावितरण’ची थकबाकी वाढत आहे. दुसरीकडे भरदिवसा पथदिवे सुरू ठेवून विजेची मोठी उधळपट्टी होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘महावितरण’ने स्थानिक स्वराज्य संस्थांना विजेचा अपव्यय टाळण्याची तंबी दिली आहे. याशिवाय वीजबचतीचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचे आवाहनही केले आहे.
नागरिकांच्या सार्वजनिक सुरक्षा आणि सोयीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून पथदिवे लावले जातात. या पथदिव्यांना ‘महावितरण’कडून वीजपुरवठा केला जातो. मात्र, अनेक नगरपंचायती, ग्रामपंचायतींच्या हद्दीतील पथदिवे भरदिवसा सुरू असल्याचे निदर्शनास येते.
पारंपरिक पथदिव्यांसह मोठे ‘हायमास्ट’चे दिवेही भरदिवसा सुरू असल्याने विजेचा मोठा अपव्यय होतो. राज्यात पावसाने ओढ दिल्याने पाणीटंचाई निर्माण झाली असून, त्याचा परिणाम विजेच्या निर्मितीवर होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे वीजेची मागणी सातत्याने वाढत असून, खरेदी दरही महागले आहेत. अशा परिस्थितीतही अनेक नगरपंचायती व ग्रामपंचायतींसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीतील पथदिवे भरदिवसा सुरू असल्याने ‘महावितरण’ने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे.