भाऊबिज या विषयावर हिरकणी सौ.अनिता गुजर राहणार डोंबिवली यांनी खुपच सुंदर असा लेख लिहला आहे..
मुंबई, डोंबिवली

सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती,
ओवळीते भाऊराया ग..
वेड्या बहिणीची वेडी ही माया .
भरजरी ग, पितांबर, दिला फाडुन
द्रौपदिसी बंधु शोभे नारायण…
अगदी खरे…. भाऊ-बहिणीच्या नात्यातील स्नेह वृद्धिंगत करणारा दिवस म्हणजे भाऊबीज. कार्तिक शुद्ध द्वितीया अर्थात, यमद्वितीया या दिवशी भाऊबीज साजरी केली जाते.
मृत्यूची देवता यम आपल्या बहिणीकडे जेवायला जात असल्याने नरकातील जिवांना या दिवशी नरकयातना भोगाव्या लागत नाहीत, अशी आख्यायिका आहे. त्यामुळेच हा दिवस भाऊ-बहिणीच्या नात्याला समर्पित दिवस समजला जातो.
तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजेच अंधारातून मला प्रकाशाकडे ने हाच संदेश दीपावली आपल्याला देते. अंधारातून प्रकाशाकडे जाणं जसं असतं, त्याचप्रमाणे अज्ञानाकडून ज्ञानाकडे, दुःखातून आनंदाकडे, नैराश्यातून उत्साहाकडे, अंधश्रद्धेतून विज्ञानाकडे, अनीतीकडून नीतीकडे, दुष्कृत्यातून सत्कृत्याकडे, असमाधानातून समाधानाकडे, गरीबीतून श्रीमंतीकडे जाणं असतं. दीपावली म्हणजेच दिव्यांचा उत्सव, प्रकाशाचा सण.
आज भाऊबीज दिवाळीतील खास दिवस.महत्वाचे दिवस सरले तर दिवाळी संपली असे म्हणतात.खरतर देवदिवाळी पर्यंत दिवाळी असते.पण धकाधकीच्या जीवनात हे चार,पाच दिवस कसेबसे माणसं वेळ काढून एकमेकांना भेटतात,आपले सण आणि संस्कृती जपतात.
जरी दिवाळी सरली तरी फटाक्यांच्या आतिषबाजीची रोषणाई ही नात्यातील संवादाची ज्योत बनून कायम तेवत रहावी आणि फराळाचे डब्बे संपले तरी नात्यातील गोडवा हृदयात कायम जपावा हेच तर सणांचे औचित्य असते हो की नाही?…..