राज्य सरकार होळीला महिलांना देणार मोफत साड्या..

लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने रेशन दुकानातून अन्न धान्याबरोबरच महिलांना साडी वाटप करण्याची घोषणा केली होती. परंतु लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे साडी वाटप टप्प्याटप्याने करावे लागले होते.
आता पुन्हा येणार्या होळीच्या सणासाठी साडी वाटप करण्यात येणार असून राज्य शासनाने जिल्हा पुरवठा विभागाकडे लाभार्थ्यांची संख्या मागवली आहे.
दरम्यान, मागील वेळच्या साडीचा दर्जा सुमार असल्याने एकट्या नगर जिल्ह्यात अजून 10 हजार साड्या पडून असून आता येणार्या साड्या कशा असणार याकडे महिलांचे लक्ष राहणार आहे. राज्य सरकारच्या वस्त्रोद्योग विभागाने गतवर्षी वर्षातून एकदा महिलांना साडी वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार जिल्ह्यातील 87 हजार 656 अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना योजनेचा लाभ मिळत आहे. प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी रेशन दुकानावर मोफत दिली जात आहे. यंदा देखील होळीच्या सणाला साडीचे वाटप होणार आहे. त्यासाठी सरकारने जिल्हा पुरवठा विभागाकडून लाभार्थी महिलांची तालुकानिहाय माहिती मागवली आहे.
असे आहेत अंत्योदय लाभार्थी
अकोले 6,240. जामखेड 5,618. कर्जत 3,531. कोपरगाव 6,767. नगर 4,706. नगर शहर 1,677. नेवासा 7,114.पारनेर 3,622. पाथर्डी 6,218. राहाता 5,577. राहुरी 6,130. संगमनेर 6,369. शेवगाव 9,750. श्रीगोंदा 8,698. श्रीरामपूर 6,639.