श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठान यांच्या तर्फे गणेशोत्सवाच्या निमित्ताने स्त्रियांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण व विशेष व्याख्यान
अहमदनगर

आदर्श गणेशोत्सव साजरा करण्याच्या निश्चयाने श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रशांत दरेकर यांनी 2023 च्या गणेशोत्सवात आगळ्या वेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्या पैकीचा एक असाच आगळा वेगळा उपक्रम पार पडला.
स्त्रीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने परिसरातील महिला भगिनींसाठी “स्वसंरक्षण प्रशिक्षण व साधणेमध्ये भक्तीची आवश्यकता” अशा विषयांवर खास व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी हिंदू जनजागृती समितीच्या समन्वयक व व्याख्यात्या कु. प्रतिक्षा कोरगावकर ताई यांनी उपस्थित महिलांना प्रशिक्षण दिले.
सुरक्षित व सभ्य परिसरात राहत असतानाही स्त्रियांना अचानकपणे विपरीत प्रसंगाला सामोरे जावे लागू शकते. अश्या वेळी हातपाय गळून जाण्याऐवजी त्या प्रसंगामध्ये स्वसंरक्षण कसे करावे? या बद्दल कु प्रतिक्षा कोरगावकर यांनी उत्तम प्रशिक्षण महिलांना दिले.
याच वेळी लेखिका सौ सायली देशपांडे यांनी देखील उपस्थित महिलांना “गर्भसंस्कार -काळाची गरज” या विषयावर उत्स्फूर्तपणे मार्गदर्शन केले. ज्या प्रमाणे नऊ महिने मोबाईल शिवाय न घालवणाऱ्या स्त्रीचे मुल सहज टेक्नोलॉजीशी जुळवून घेते, त्याच प्रमाणे नऊ महिने गर्भसंस्कार केलेल्या स्त्रीचे मुल एक आदर्श अपत्य, आदर्श नागरिक घडते अश्या सोप्या शब्दात सौ सायली देशपांडे यांनी त्यांचा विषय सर्वांच्या मनापर्यंत पोचेल अशा शब्दात मांडला.
धांगड-धिंगा गोंधळ युक्त कार्यक्रमांऐवजी समाजप्रबोध व समाज विकास होईल अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्याची गरज आहे व त्या अनुषंगाने आम्ही काम करतो आहोत अशी भूमिका विघ्नहर्ता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रशांत दरेकर यांनी त्याच्या मनोगतात मांडली.