
लेक लाडकी’ योजनेच्या प्रसारासाठी राज्याच्या बाल व महिला विकास विभागाच्या वतीने एक लाख अंगणवाडी सेविकांना लेखन पुस्तिकांचे (रायटिंग पॅड) वाटप केले जाणार आहे.
या ‘रायटिंग पॅड’ वर लेक लाडकी योजनेची डिजिटल माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे. एका खासगी कंपनीने हे ‘रायटिंग पॅड’ सवलतीच्या दरात पुरवठा करण्याची तयारी दर्शवली आहे. ‘मुलांचे शिक्षण हेच राष्ट्र प्रगतीचे लक्षण’ असा संदेश या ‘रायटिंग पॅड’वर प्रसिद्ध केला आहे.
राज्य सरकारने ‘लेक लाडकी’ योजना लागू केली आहे. त्याअंतर्गत १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींच्या पालकांना पाच हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. त्यानंतर सहा टप्प्यात एक लाख एक हजार रुपये सरकारतर्फे दिले जाणार आहेत.
या योजनेची माहिती राज्यात सर्वत्र पोहोचवण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने अंगणवाडी सेविकांना ‘रायटिंग पॅड’ देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. एका खासगी कंपनीने या ‘रायटिंग पॅडची’ किंमत ३०० रुपये प्रति नमूद केली आहे.
ही रक्कम कमी करून परवडणाऱ्या किमतीत हे ‘रायटिंग पॅड’ खरेदी करण्याचा बाल विकास विभागाचा प्रस्ताव आहे. या ‘रायटिंग पॅडचा’ शहरी भागात फारसा वापर केला जात नाही.
पण ग्रामीण भागात हे ‘रायटिंग पॅड’ परीक्षा काळात वापरण्याची पद्धत प्रचलित आहे.