
येथील शहर सहकारी बँकेच्या कर्ज फसवणूक प्रकरणात शहरातील एका बड्या चार्टर्ड अकाऊंटंटला आर्थिक गुन्हे शाखेने दापोली जवळून ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
बुधवारी (दि. 13) सायंकाळी दापोली येथून पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, चौकशीसाठी ताब्यात घेतले की अटक करण्यात आली, कोणत्या गुन्ह्यात ही कारवाई झाली, याबाबत अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. दरम्यान, ताब्यात घेतल्याच्या वृत्ताला पोलीस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. एका मोठ्या कर्ज प्रकरणात फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. या गुन्ह्यात यापूर्वी काहींना अटकही करण्यात आलेली आहे.
याच प्रकरणात आता एका मोठ्या चार्टर्ड अकाऊंटंटला ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्याला दापोली येथून पळून जाण्याच्या तयारीत असताना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून मात्र अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.