
फॉरेनमध्ये शिक्षण घेत असलेल्या डीग्रस वाणी येथील फॉरेन रिटर्न महिला सरपंच डॉ. चित्रा अनिल कुऱ्हे यांनी गावाच्या विकासाचे स्वप्न रंगवत ग्रामपंचायत निवडणूक लढवली. गावकऱ्यांनी देखील या सरपंच महिलेला साथ देत भरगच्च मताने निवडून देखील आणले होते. आता कुठेतरी या गावची फॉरेन रिटर्न सरपंचाच्या नावाने सर्वत्र ओळख झाली आहे. गावांमध्ये विकास होईल अशी प्रत्येकालाच अपेक्षा लागली होती. या सरपंच महिलेने ग्रामपंचायतीचा विकास देखील केला. ग्रामपंचायतमध्ये सदस्य, सरपंच व उपसरपंच यांना बसण्यासाठी सुसज्ज अशी खोली बनवलीय खरी. मात्र, गावच्या विकासाची प्रत्येकालाच प्रतीक्षा लागलेली आहे.
प्रत्येकाला निदान या वर्षी तरी गावातील कामे पूर्ण होतील असे वाटले होते. मात्र, झाले भलतेच सरपंच झालेल्या महिला सरपंच निवडणूक विभागाकडे निवडणूक खर्च दाखल करायचंच विसरल्या आणि हीच मोठी चूक त्यांना भोवली आहे. या महिला सरपंचाला सरपंच पदावरून हटवलं आहे. तसे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. चित्रा कुऱ्हे यांना सरपंच होऊन चार वर्षे झाले होते.
डॉ. चित्रा कुऱ्हे ह्या गावचा विकास करण्यासाठी स्विडन येथून खेडेगावात परतल्या होत्या. निवडणूक विभागाच्या नियमांचे पालन न केल्याने त्यांना आपले सरपंच पद गमवावे लागले आहे. हिंगोलीच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर ही कारवाई केली आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार त्यांनी निवडणूक विभागाकडे निवडणुकीच्या खर्चाचा तपशील दाखल केला नाही.
त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे. चित्रा कुऱ्हे ह्या विदेशात स्थायिक झाल्या होत्या. मात्र, त्यांची मातृभूमी सोबत जुळलेली नाळ यामुळे त्यांनी आपल्या गावाकडे गावचा विकास हवा या दृष्टीने त्या राजकारणात उतरल्या. त्यात त्यांना मोठे यश देखील मिळालं. मात्र, या कारवाईमुळे त्यांचं पद रिक्त झालं आहे.