ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

दिलखुलास गप्पामहाराष्ट्र

प्रचिती या विषयावर हिरकणी सौ. अनिता गुजर यांचा लेख नक्कीच वाचा

राहाणार डोंबिवली..

मुलांच्या परीक्षा संपल्या आणि मे महिन्याची सुट्टी लागली. मग काय मुलांची भुणभुण चालू झाली, आई फिरायला जाऊया ना! कसेतरी तरी समजूत काढली तेव्हा कुठे ती शांत झाली.

ह्यांनी ऑफिसात रजा टाकली आणि सासू सासर्यांना विचारून सर्वांनी गावी जायचा विचार केला. मुलेही खुश झाली. आमच्या गावी जायच्या रस्त्यावर जेजुरी लागते. तेव्हा सासूबाईंनी जाता जाता खंडोबाचे दर्शन घेण्याची ईच्छा व्यक्त केली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून जेवण आणि नाष्टा करून बांधून घेतला सर्वांसाठी.

प्रवासात आम्ही शक्यतो बाहेरचे खाणे टाळतो. गणपती बाप्पा मोरया म्हणत प्रवासाला सुरवात केली. प्रवासात गार हवा लागली की मुलांना भूक लागते. नाश्त्यासाठी करून आणलेल्या इडली चटणीचा फडशा पडला. आजूबाजूचे सृष्टीसौंदर्याची मजा घेत प्रवास सुरुच होता. उन्हाळा फ़ारच जाणवत होता.जेजुरी जवळ आली तशी हे सासूबाईंना म्हणाले आई आपण परत कधीतरी जाऊया जेजुरीला . ऊन खूप आहे अशा उन्हात गड चढणे त्रासदायक होईल तुला,आणि आपल्याला गावी पोहचायला उशीरही होईल. तसे सासूबाई नाराज झाल्या खऱ्या पण ठीक आहे पुढल्या वेळेस तरी नक्की जाऊया असे म्हणाल्या. जेजुरी सोडून पुढे गेलो . एक वाजले असतील. मुलांना भुखा लागल्या होत्या म्हणून मी ह्यांना म्हटले की कुठे सावली बघून जेवून घेऊ आपण. ह्यांनी रस्ताच्या बाजूला एका मोठ्या झाडाजवळ गाडी उभी केली. गाडीतून चटई काढली आणि त्या झाडाखाली अंथरली. भर उन्हात ही त्या झाडाच्या सावलीत खूप शांत वाटत होते. मी डबे उघडले आणि सर्वाना जेवण वाढले . आजूबाजूला एकही चिटपाखरू सुद्धा न्हवते. सर्व गप्पागोष्टी करत जेवणाचा आस्वाद घेत होते. भर मध्यान्ह असल्यामुळे कोणतीही रहदारी न्हवती. एवढ्यात कुठून कोण जाणे एक म्हातारा काठी टेकत आमच्या मागे उभा राहिला आणि म्हणाला वाईच भाकर मिळेल का लय भूख लागली हाय. तसे सासूबाईंनी त्याला एक भाकरी भाजी कांदा असे जेवायला आणि ग्लासभर पाणी दिले आणि म्हणाली बाबा इथं बसून जेवा. तसा तो म्हातारा आमच्या पाठी बसून जेवू लागला. मग आम्हीही आमच्या जेवणात दंग झालो. सासूबाईंचे जेवण संपले म्हणून त्यांनी मागे वळून पाहिले तर कोणीच न्हवते. त्या चटकन उठल्या आणि आंम्हाला म्हणाल्या अरे ते म्हातारे बाबा कुठे गेले. पाण्याचा रिकामा ग्लास तर इथेच आहे.आम्ही सर्वे चकीत झालो. खरच त्याच्या जायचा रस्ता तर आमच्या समोरच होता मग ते म्हातारे गृहस्थ गेले कुठे. बघताच क्षणी सासूबाईंनी हात जोडले आणि म्हणाल्या आम्ही तुझ्या भेटीला नाही आलो तर तूच येऊन दर्शन देऊन गेलास. तुझी लीला अगाध आहे खंडेराया. सासूबाईंचे ऐकून माझ्या अंगावर काटा आला. खरंच आहे कोणी साधारण मनुष्य असा अदृश्य होऊच शकत नाही. परमेश्वराच्या अस्तित्वाचा अनुभव त्या दिवशी आम्हाला आला. परमेश्वरी शक्ती अजूनही आपल्या आजूबाजूला वावरत असते पण याची प्रचिती फक्त खऱ्या भक्तालाच येते. हा माझ्या आयष्यातील अविस्मरणीय प्रसंग आहे. अजूनही आठवला की अंगावर काटा येतो. मग गावावरून घरी येताना मात्र आम्ही जेजुरीला जाऊन खंडेरायाचे दर्शन घेऊन मगच घरी परतलो.

यळकोट यळकोट… जय मल्हार…

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे