
नगर अर्बन को ऑप बँकेच्या कर्ज गैरव्यवहार व घोटाळा प्रकरणात पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सीए शंकर घनश्यामदास अंदानी (४५, नगर) याला बुधवारी सायंकाळी अटक केली. गुरुवारी न्यायालयापुढे हजर केले जाणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी दिली.
सीए शंकर अंदानी हा बँकेचा तज्ज्ञ संचालक म्हणून नियुक्त करण्यात आला होता. उपअधीक्षक मिटके यांनी गेल्या आठवड्यात आर्थिक गुन्हे शाखेचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच बँकेच्या घोटाळ्यासंदर्भात कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता या गैरव्यवहाराच्या तपासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बँकेने मंजूर केलेल्या कर्जातील रक्कम कंपनीच्या खात्यावरून नंतर अंदानीच्या खात्यात जमा झाल्याचे पोलिसांच्या तपासात आढळले आहे. याच संशयावरून अंदानी याला अटक करण्यात आली. याशिवाय बँकेत जी गैरव्यवहाराची प्रकरणे झाली, त्यातही अंदानी याने संचालक मंडळाला सल्ले दिल्याचा पोलिसांना संशय आहे.
अर्बन बँक गैरव्यवहार प्रकरणात आत्तापर्यंत बँकेचे अध्यक्ष अशोक कटारिया यांच्यासह दोन संचालक, दोन शाखाधिकारी, दोन कर्जदारांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे.