सण आयलाय गो आयलाय गो… नारळी पुनवेचा
मुंबई प्रतिनिधी - कोळी बांधवांकडून होडीच्या सजावटीची जय्यत सुरुवात

चातुर्मासाची सुरुवात करणारा श्रावण महिना तसा सणासुदीने भरलेलाच.
याच श्रावणातील नागपंचमी, गोकुळाष्टमी, दहिहंडी, श्रावणी सोमवार या सणांबरोबरच उत्साहाने साजरा केला जाणारा सण म्हणजेच नारळी पौर्णिमा समुद्रकिनारी राहणारे व समुद्राशी खूप जवळचा संबंध असणारे कोळी लोक हा सण खूप उत्साहाने साजरा करतात.
यंदाच्या वर्षीही या नारळीपौर्णिमेच्या सणाची जोरदार तयारी कोळी बांधवांनी सुरु केली आहे. त्यांनी आपापल्या होड्यांना रंगरंगोटी करुन सजवण्यास सुरुवात केली आहे.
अगदी पूर्वीपासून ते आजतागायत चालत आलेली ही परंपरा ते अगदी आनंदाने जपत आहेत. पण याचे एक शास्त्रीय कारणदेखील आहे. श्रावण महिना म्हणजे पावसाचा काळ. या काळात समुद्र खवळलेला असतो. तसेच हा माशांचा प्रजननाचा काळ असतो.
त्यामुळे नारळीपौर्णिमेच्या काही दिवस अगोदरच कोळी बांधव समुद्रात जाणे, मासेमारी करणे बंद करतात. म्हणजेच निसर्गाचे रक्षण केले जाते.
या सणाला धार्मिक बाजूदेखील आहे. समुद्र हे वरूण देवाचे स्थान समजले जाते. वरुण देव हा पश्चिम दिशेचा रक्षक असून त्याला या नारळीपौर्णिमेच्या दिवशी नारळ अर्पण करुन त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. मासेमारीचा बंद केलेला व्यवसाय नारळीपौर्णिमेच्या दिवशी पुन्हा सुरु केला जातो. पावसाळा संपलेला असतो त्यामुळे सागराची पूजा करुन व्यवसायाचा शुभारंभ केला जातो. नारळीपौर्णिमेच्या दिवशी मासेमारीचा शुभारंभ करताना होडीला रंगरंगोटी करुन सजवले जाते, पताका लावून सुशोभित केले जाते. आपल्या उदरनिर्वाहासाठी कामी येणार्या प्रत्येक गोष्टीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची कोळ्यांची भावना यातून दिसून येते.
अत्यंत पारंपरिक पद्धतीने साजर्या केल्या जाणार्या या सणाची लगबग मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमधील कोळीवाड्यात जास्त प्रमाणात पाहायला मिळते. अशाच उत्साहात यंदाच्या नारळीपौर्णिमेसाठी कोळी बांधवांची लगबग सुरु झाली आहे.
माहिम रेती बंदर, कोळीवाडा येथील काही कोळी बांधवांची होड्या सजवतानाची खास दृश्ये टिपली आहेत .