१ मेचा निकाल ठरणार खास – आता प्रगतीपुस्तकासोबत पाल्याच्या उत्तरपत्रिकाही पालकांना दाखवणे अनिवार्य
अहिल्यानगर

राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचा निकाल येत्या १ मे रोजी जाहीर होणार असून, यंदा शिक्षण विभागाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
हा निर्णय जाहीर करतांनाच एक क्रांतिकारी म्हटल्या जावू शकणारा निर्णय पण शिक्षण संचालनालयाने घेतला आहे. या दिवशी विद्यार्थी व पालक यांना प्रगतीपुस्तक देण्यात येते. त्यावरून पालकांस आपल्या पाल्याची गुणवत्ता निदर्शसनास येते. वर्षभर आपला मुलगा शाळेत जे काही शिकला, त्याचे मोघम मूल्यमापन होते.
शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की, शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चा निकाल १ मे २०२६ रोजी प्रसिद्ध केला जाईल.
त्यानंतर २ मे २०२६ पासून राज्यातील सर्व राज्य मंडळाच्या शाळांना अधिकृतपणे उन्हाळी सुट्टी सुरू होईल. नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये सुसंगती आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
याच दिवशी एक महत्वाची घडामोड पण घडणार. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (NEP 2020) नुसार विद्यार्थ्यांच्या क्षमता ओळखणे आणि त्यांचा सर्वांगीण विकास करणे हे शिक्षक व पालकांचे संयुक्त कर्तव्य आहे.
त्यादृष्टीने एक पाऊल टाकण्यात आले आहे. निकाल देतांना आता केवळ प्रगतीपुस्तक नं देता विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पालकांना दाखविणे अनिवार्य करण्यात आले आहे. शिक्षण आयुक्तानी असे आदेश दिले आहेत.पालकांच्या निदर्शनास आणल्यामुळे पालकांना आपल्या पाल्याची संकल्पनात्मक समज, उत्तर लिहिण्याचे कौशल्य आणि नेमक्या चुका कोठे होत आहेत, याचे अचूक निदान करता येईल. केवळ गुणांवर लक्ष केंद्रित न करता, मुलांच्या कौशल्यांवर आधारित प्रगती मोजणे यामुळे शक्य होणार आहे.
शिक्षण संचालनालयाने या निर्णयाचे विविध फायदे स्पष्ट केले आहेत. विद्यार्थ्यांच्या कच्च्या दुव्यांवर पालकांच्या मदतीने घरच्या घरी उपाययोजना करणे सोपे होईल.
पाल्याच्या अभ्यासाच्या सवयी, वाचन आणि लेखनाबाबत पालक अधिक सजग व जबाबदार होतील. मूल्यमापन प्रक्रियेबाबत पालकांचा विश्वास वाढेल आणि विद्यार्थ्याच्या प्रगतीचे वस्तुनिष्ठ चित्र समोर येईल.




