शनि शिंगणापूर येथे शनिदेव ‘बंदिस्त’ प्रकरणी स्पष्टीकरणाची मागणी- खासदार नीलेश लंके यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

जगप्रसिद्ध शनि शिंगणापूर येथे अलीकडेच सुरक्षा व्यवस्थेच्या नावाखाली शनिदेवाच्या मूर्तीभोवती लोखंडी संरचना उभारण्यात आल्याची बाब निदर्शनास आली असून, याबाबत खासदार नीलेश लंके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
खासदार लंके यांनी शनिवारी मध्यरात्री मंदिराला भेट दिली असता, पारंपरिक स्वरूपात उघड्यावर असलेली शनिदेवाची शिळा लोखंडी दरवाज्यांमधून बंदिस्त केल्याचे आढळले. शिंगणापूर हे “देव आहे पण देऊळ नाही, घरं आहेत पण दरवाजे नाहीत” या वैशिष्ट्यपूर्ण परंपरेमुळे देश-विदेशात ओळखले जाते. अशा ठिकाणी श्रद्धेच्या केंद्रस्थानी असलेल्या देवतेला बंदिस्त करणे ही भाविकांच्या भावना दुखावणारी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
या संदर्भात मंदिर प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात येणार असून, अशा प्रकारच्या निर्णयामागील कारणे स्पष्ट करण्याची मागणी करण्यात येत आहे. सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी सीसीटीव्ही, दर्शन व्यवस्थापन यांसारखे उपाय स्वीकारार्ह असले तरी, परंपरेला धक्का पोहोचवणारे बदल टाळावेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच, शिंगणापूरची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आणि धार्मिक अस्मिता अबाधित राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून, भविष्यात अशा प्रकारचे निर्णय घेताना स्थानिक भाविक व परंपरा यांचा आदर राखावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
याप्रकरणी लवकरच अधिकृत पत्रव्यवहार करून प्रशासनाकडून सविस्तर स्पष्टीकरण मागविण्यात येणार असल्याची माहितीही खासदार लंके यांनी दिली.




