ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

क्रिडा व मनोरंजनब्रेकिंग

पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसचा गड सर. सुभेदार सिनेमाची एका दिवसात कोट्यवधींची कमाई

मुंबई - दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'सुभेदार' २५ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा दाखवणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पहिल्याच दिवशी सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.

गेल्या वर्षभरात मराठी सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर आपलं वर्चस्व गाजवलं. बॉलिवूडच्या बिग बजेट सिनेमांनाही मागे सारत कोट्यवधींची कमाई केली. वेड, बाईपण बारी देवा यांसारख्या सिनेमांनतर आता आगामी सिनेमांविषयीही उत्सुकता आहे.

दरम्यान, बहुचर्चीत असा ‘सुभेदार’ सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. एका दिवसात सिनेमानं एक कोटीचा आकडा पार केला आहे. ही बाब नक्कीच मराठी सिनेसृष्टीला सुखावणारी अशीच आहे.

शिवराज अष्टकातल्या ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ या चारही चित्रपटांच्या घवघवीत यशानंतर लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी शिवकालावर बेतलेल्या ऐतिहासिक चित्रपटांवरची आपली मजबूत पकड दाखवून दिली.

बंदिस्त पटकथा, दमदार संवाद, दिग्गज कलाकारांचा अभिनय, तंत्रकुशल टीम आणि जबरदस्त दिग्दर्शनाची जोड असल्यानं शिवराज अष्टकातलं पाचवं पुष्प ‘सुभेदार’ या चित्रपटाबद्दल असणारी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.

राज्यातील ३५०हून अधिक चित्रपटगृहांतील ९००पेक्षा जास्त शोज सह देशातल्या विविध शहरांत; तसंच इतर सहा देशांत ‘सुभेदार’ प्रदर्शित झाला असून, पहिल्याच दिवशी सगळीकडं या चित्रपटाला जोरदार प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं.

शिवरायांनी आपल्या शूर शिलेदारांच्या साह्यानं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि ते प्रत्यक्षातही उतरवलं. महाराजांच्या शब्दासाठी आयुष्य पणाला लावणाऱ्या या शिलेदारांचा इतिहास रूपेरी पडद्यावर अपवादानंच मांडला गेला. सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचा हाच जीवनपट ‘सुभेदार’ या चित्रपटातून आपल्यासमोर आला आहे.

कमाई किती?

संकेतस्थळाने दिलेल्या आकड्यांनुसार या सिनेमानं पहिल्या दिवशी १.२ कोटींची कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी हा आकडा दोन कोटींवर जाण्याची शक्यता आहे.

सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचं कल्याणकारी जीवनकार्य आणि स्वराज्यासाठीच्या बलिदानाची तेजस्वी यशोगाथा मांडणाऱ्या या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर, समीर धर्माधिकारी, अभिजित श्वेतचंद्र, स्मिता शेवाळे, उमा सरदेशमुख, अलका कुबल, ज्येष्ठ दिग्दर्शक मा. राजदत्त, दिग्पाल लांजेकर, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, शिवानी रांगोळे, विराजस कुलकर्णी, अजिंक्य ननावरे, ऋषी सक्सेना, नूपुर दैठणकर, अर्णव पेंढरकर आदी मराठीतल्या दिग्गज कलाकारांच्या भूमिका आहेत.

‘ए. ए. फिल्म्स’ आणि ‘एव्हरेस्ट एंटरटेंन्मेंट’ची प्रस्तुती असलेल्या ‘सुभेदार’ या चित्रपटाची निर्मिती ‘राजवारसा प्रॉडक्शन्स’, ‘मुळाक्षर प्रॉडक्शन्स प्रा. लि,’ ‘पृथ्वीराज प्रॉडक्शन्स’, ‘राजाऊ प्रॉडक्शन’, ‘परंपरा प्रॉडक्शन्स’ यांनी केली आहे. प्रद्योत पेंढारकर, अनिल वरखडे, दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, श्रमिक गोजमगुंडे, विनोद जावळकर, शिवभक्त अनिकेत जावळकर, श्रुती दौंड हे ‘सुभेदार’ या चित्रपटाचे निर्माते आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे