आयुष्यात टिपकागद व्हा.. या विषयावर हिरकणी सौ.अनिता गुजर राहणार डोंबिवली यांनी खुपच सुंदर लेख लिहिलाय..
मुंबई - डोंबिवली

प्रत्येकात साऱ्या गोष्टी अथवा गुण कधीच नसतात. मात्र प्रत्येकात काहींना काही गुण असतोच.जे आपल्यात नाही ते इतरांकडे असू शकते. जे इतरांकडे नाही ते आपल्याकडे असू शकतं. अशा एकमेकांच्या गुणांचा वापर करीत आपल्यातला उणेपणा भरून काढता येतो.सर्वोत्तम यश गाठता येतं.
एकमेकांना पराभूत करण्यात शक्ती खर्ची घालण्यापेक्षा एकमेकांच्या शक्तीच्या बळावर बलाढ्य काही करता येतं. एखाद्या व्यक्तीचा आदर्श घेऊन तुम्ही नक्कीच तुमचे कार्य करू शकता पण त्या व्यक्तीचे अनुकरण करू नये. स्वतःच्या आत्मप्रौढी वृत्तीने त्याची स्पर्धा करण्याच्या नादात तुमचा शर्यतीतला ससा होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे . वैयक्तिक मोठेपणाच्या अभिलाषेपायी निव्वळ दुसऱ्याच्या चुका काढण्यापेक्षा, त्यांच्यातील चुकांकडे दुर्लक्ष करून त्यांच्यातील उत्तम गुण हेरून त्यांचा वापर करून घेणं, ही खरी यशस्वी क्रियाशीलता !
उपयोगी पडणारी माणसं मिळवणं आणि आपण कोणाच्या उपयोगी पडू शकतो ते पाहून त्याला मदत करणं या सहकार्यभावनेच्या जोरावरच मोठमोठी कार्य सिद्धीस नेली जातात. काही लोकांकडे कल्पनाक्षमता असते;पण कल्पना सत्यात उत्तरावणारी कृतीक्षमता नसते.काहींकडे शक्ती असते; पण योग्य नियोजनक्षमता नसते. काहींकडे संघटनक्षमताअसते; पण निर्णयक्षमता नसते. निर्णयक्षमता असते; तर नेतृत्वक्षमता नसते. अशावेळी ज्याच्याकडे जे आहे त्याचा त्याच्या गुणांचा योग्य वापर करीत सांघिकपणे पुढे जाणे म्हणजेच बिकट रणांगणही जिंकणे!
यश मिळवायचं असेल तर असे गुण आणि गुणी माणसं वेचणं हे फार महत्त्वाचं !संकटाच्या क्षणी गोगलगायीसारखे पोटात पाय घेऊन स्वतःच्याच कोषात लपून राहणं टाळलं पाहिजे!याउलट जास्तीत जास्त माणसं जोडा. जुन्या गोष्टी विसरून नव्याने मैत्री करा. साऱ्यांच्या संपर्कात राहा. मिळूनमिसळून वागा. तुमच्यासाठी जे जे उत्तम ते ते शोषून घेण्यासाठी तत्पर असलेले टिपकागद व्हा !….हो पण आयुष्याचा मार्गक्रमण करताना थोडे सिंहावलोकन करणे गरजेचे असते हे ही लक्षात ठेवा……