
साईसंस्थानच्या देणगी कक्षात देणगीदारांनी दिलेल्या देणगीपोटी बनावट पावती देऊन एकाच वेळी साईसंस्थान व देणगीदारांची फसवणूक करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. साईसंस्थानच्या वतीने याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस उपाधीक्षक संदीप मिटके यांनी चौकशी सुरू केली आहे. साईसंस्थानला पाठविण्यात आलेल्या निनावी पत्रामुळे या प्रकारास वाचा फुटली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साईसंस्थान प्रशासनाला एक निनावी पत्र पाठविण्यात आले. त्यात देणगी कार्यालयात सुरू असलेल्या प्रकाराची माहिती देण्यात आली. एकच कर्मचारी विशिष्ट पद्धतीने अपहार करत आहे.
दर महिन्याला चार ते पाच लाख रुपयांचा अपहार केला जातो. संस्थान प्रशासनात त्याची कुजबूज सुरू असतानाही कारवाई होत नाही. वृद्ध, अडाणी आणि मध्यस्थांमार्फत आलेल्या देगणीदारांची प्रामुख्याने फसवणूक केली जाते. दिलेल्या रकमेचे दोन भाग करून पावत्या दिल्या जातात.
त्यातील एक बनावट असते. बनावट पावतीची संस्थानकडे नोंद होत नाही. त्या रकमेचा अपहार केला जातो. विशिष्ट केमिकलचा वापर केला जातो. त्यामुळे हा प्रकार कुणाच्याही लक्षात येत नाही, असे या पत्रात नमूद केले होते. साईसंस्थानच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता, त्यात तथ्य आढळल्याने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.