धनगर आरक्षणासाठी नगर- संभाजीनगर महामार्ग राेखला, जुन्नरला आदिवासी समाजाचा विराेध
शेकडो समाजबांधव रस्त्यावर उतरले. यावेळी आंदाेलकांनी आरक्षणाची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली.

धनगर समाजाने आज (शनिवार) धनगर आरक्षणाची मागणी करीत नेवासा येथे महामार्गावर रास्ता राेकाे आंदाेलन छेडले. दरम्यान दूसरीकडे आमच्या ताटातला घास कुणालाही देणार नाही असं म्हणत आदिवासी बांधवांनी नगर कल्याण महामार्गावर बसुन आंदोलन छेडले आहे.
धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे अशी मागणी नगर जिल्ह्यातून करण्यात आली. सकल धनगर समाजाच्या वतीने अहमदनगर – संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको आंदाेलन करण्यात आले. या आंदाेलनात नेवासा तालुक्यातील शेकडो समाजबांधव रस्त्यावर उतरले. यावेळी आंदाेलकांनी आरक्षणाची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली.
धनगर समाजाला अनुसुचित जातीत समाविष्ट करु नका
दरम्यान धनगर समाजाला आरक्षण देत असताना धनगर समाजाला अनुसुचित जातीमध्ये समाविष्ट करु नये यासाठी जुन्नर तालुक्यात आदिवासी समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
यावेळी आदिवासींच्या योजना सुध्दा धनगर समाजाला देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. धनगर समाजाला आदिवासींच्या योजना द्या किंवा त्यांच्यासाठी नवीन आणखी काही योजना आणा आम्हाला काही हरकत नाही मात्र यासाठी आदिवासींच्या विभागाचा एकही पैसा खर्च होता कामा नये अशी मागणी यावेळी करण्यात आली.