अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन

अयोध्येत निर्माणाधीन असलेल्या राम मंदिराचे उदघाटन २२ जानेवारी २०२४ रोजी होणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीसह इतर ८००० व्यक्तींना या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
श्री राम जन्मभूमी ट्रस्टकडून माजी क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांनाही निमंत्रित केले असल्याची माहिती समोर येत आहे. या दोघांसह देशभरातून संत, अध्यात्मिक गुरू, सेलिब्रिटी, सनदी अधिकारी, संरक्षण विभागातील उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
कोहली आणि तेंडुलकर यांच्याशिवाय उद्योगपती मुकेश अंबानी, गौतम अदाणी आणि रतन टाटा उपस्थित राहणार आहेत. बॉलिवूडमधून अमिताभ बच्चन, अभिनेते अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया यांनाही निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती जनसत्ता संकेतस्थळाने दिली आहे.
श्री राम जन्मभूमी ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सांगितले की, ५० देशांमधून एका प्रतिनिधिला निमंत्रित करण्याचा आमचा विचार आहे. राम मंदिरासाठी आंदोलन करताना ५० कारसेवकांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबियांना यावेळी सन्मानाने निमंत्रित केले आहे. तसेच वैज्ञानिक, लेखक आणि न्यायाधीशांनाही आम्ही बोलावले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांसमवेत पद्म पुरस्कार विजेत्यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.