बालिकाश्रम रोड परिसरात ५५ वर्षीय व्यक्तीवर चाकूने भोसकून हल्ला..
अहिल्यानगर

बालिकाश्रम रोड परिसरात ५५ वर्षीय व्यक्तीवर चाकूने भोसकून हल्ला करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली. रविंद्र रामभाऊ चव्हाण (वय ५५, रा. यश अपार्टमेंट, बोल्हेगाव) यांचा या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला.
प्राथमिक माहितीनुसार, चव्हाण हे बालिकाश्रम रोड परिसरात असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर हल्लेखोर पसार झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला आहे. हत्येमागील कारण तसेच हल्ल्यात नेमके किती जण सहभागी होते, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, जिल्हा रुग्णालयात नातेवाईक व नागरिकांची गर्दी झाली. बालिकाश्रम रोडवरील या रक्तरंजित घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



