
सोमवार 5 ऑक्टोबर 2026 रोजी दिल्लीगेट येथील बालक मंदिर महिला मंडळ शाळेमध्ये महिला मंडळ संस्थेतर्फे जागतिक शिक्षक दिन व मातृदिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवनाने झाली.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अहिल्यानगरचे उपमहापौर माननीय धनंजयजी जाधव तसेच न्यायमूर्ती श्री चंद्रचूड गोंगले हे होते .त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.चित्रा गोंगले व बहीण सौ शोभा मुळे याही उपस्थित होत्या..
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला मंडळाच्या सेक्रेटरी सौ ज्योती कुलकर्णी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सौ. मीनल गंधे व पत्रकार शिल्पा रसाळ यांनी करून दिला . आदर्शमाता म्हणून सौ. मंगल गाजरे यांचा सत्कार झाला .. त्यांचा परिचय सौ. उमा देशमुख यांनी करून दिला. यावेळी पाहुणे मा . श्री चंद्रचूड गोंगले यांचा महिला मंडळाच्या सेक्रेटरी सौ ज्योती कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
माननीय उपमहापौर श्री धनंजय जाधव यांचा सत्कार संस्थेच्या अध्यक्षा सौ ज्योती केसकर यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी बालक मंदिर महिला मंडळ शाळेतर्फे निसर्ग वाचवा भविष्य घडवा हे पर्यावरण विषयावर पथनाट्य सादर करण्यात आले.
हे पथनाट्य सौ. शूळ अस्मिता, सौ. मनिषा कुलकर्णी व श्रीमती निरुपमा देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथनाट्य सादर केले. आपल्या भाषणात बोलताना यावेळी न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी मराठी माध्यमाच्या शाळांचे महत्त्व विशद केले. तसेच या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे संस्कार अतिशय चांगले असतात व हे विद्यार्थी भविष्यात चांगल्या पद्धतीने नावा रुपाला येतात आणि समाजाची सेवा करतात असे आवर्जून सांगितले. तसेच माननीय उपमहापौर धनंजय जाधव यांनी प्रत्येकाने पथनाट्यातील संदेशाचे पालन करावे असे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी शाळेत शिक्षकांचे आणि घरी आपल्या मातांचे व्यवस्थित ऐकले तर आयुष्यात नक्कीच चांगली प्रगती कराल असे त्यांनी नमूद केले.
महिला मंडळ संस्थेतर्फे बालक मंदिर महिला मंडळ शाळेतील सर्व शिक्षिकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापिका सौ अस्मिता शूळ यांनी सर्व शिक्षिकांच्या वतीने सत्काराला उत्तर दिले .
शाळेतील विद्यार्थीकल्याणासाठी न्यायमूर्ती गोंगले साहेब यांनी शाळेला 11000 रुपयांची देणगी दिली .कार्यक्रमाचे आभार संस्थेच्या उपाध्यक्षा सौ विद्या होलेहुन्नूर यांनी मानले. संस्थेच्या सदस्या पुष्पा चितांबर यांचा सहस्त्रचंद्र दर्शना निमित्ताने सत्कार करण्यात आला .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मेधा धोपावकर यांनी केले . गौरी मुळे अनुराधा देशमुख सौ देशमुख ,पाटील या पदाधिकारी उपस्थित होत्या . कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली.



