कचरा गाड्यांच्या व्यवसायात भागीदारीचे आमिष दाखवून दोघांची १०.६१ लाखांची फसवणूक
अहिल्यानगर

कचरा गाड्यांच्या मेंटेनन्सच्या व्यवसायात भागीदार करून घेण्याचे आमिष दाखवून हॉटेल व्यावसायिकासह त्यांच्या मित्राकडून १० लाख ६१ हजार रुपये घेतल्यानंतर पैसे परत न करता तसेच व्यवसायात भागीदारी न करता फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.
याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अविनाश विष्णू कोल्हे (रा. शिवाजीनगर, कराळेवाडी, ता. राहुरी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत अजिंक्य राजन शेलार (वय ३५, रा. सपना अपार्टमेंट, शिंदे हॉस्पिटलसमोर, बुरुडगाव रोड, अहिल्यानगर) यांनी २९ ऑगस्ट रोजी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, त्यांच्या माळीवाडा बसस्थानकाजवळील हॉटेलमध्ये अविनाश कोल्हे नेहमी येत असल्याने दोघांची ओळख झाली होती. कोल्हे याने आपण अहिल्यानगर महानगरपालिकेच्या कचरा गाड्यांच्या मेंटेनन्सचे काम पाहत असल्याचे सांगितले. या कामासाठी सध्या भांडवलाची गरज असून मेंटेनन्सची बिले मंजूर होण्यास विलंब होत असल्याचे त्याने शेलार यांना सांगितले.
मेंटेनन्सच्या कामासाठी पैसे दिल्यास बिलाची रक्कम मिळाल्यानंतर पैसे परत देण्याबरोबरच कचरा गाड्यांच्या मेंटेनन्स व्यवसायात भागीदार करून घेण्याचे आश्वासन कोल्हे याने दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या आश्वासनावर विश्वास ठेवून शेलार यांनी ७ लाख ११ हजार रुपये कोल्हे याला दिले. तसेच शेलार यांचे मित्र रोहित राजेंद्र बिदे यांच्याकडूनही कोल्हे याने मेंटेनन्सच्या कामासाठी व व्यवसायात भागीदार करून घेण्यासाठी एकूण ३ लाख ५० हजार रुपये घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
त्यानंतर पैसे परत न करता व भागीदारी न देता फसवणूक केल्याने अखेर कोतवाली पोलिसांत धाव घेत फिर्याद देण्यात आली.




