ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

वडिलांचे छत्र हरपले, पण जिद्द हरली नाही, रविराज झेंडेंची MPSC मध्ये दैदिप्यमान भरारी.. 

चिखली

राज्यात 16वा, OBC प्रवर्गात दुसरा क्रमांक, दुय्यम निबंधकपदी निवड..

प्रतिकूल परिस्थिती, संघर्ष आणि अनेक अडचणींवर मात करत चिखली गावातील होतकरू विद्यार्थी रविराज दत्तात्रय झेंडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) गट-ब परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. रविराज यांनी राज्यात 16वा क्रमांक, तर OBC प्रवर्गातून राज्यात दुसरा क्रमांक पटकावत दुय्यम निबंधक (Sub-Registrar) या प्रतिष्ठेच्या पदावर निवड मिळवली आहे.

तसेच STI विक्रीकर निरीक्षक यादेखील पदावर एकाच वेळी निवड झाली. त्यांच्या या यशामुळे चिखली गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

रविराज यांच्या यशामागे संघर्षाची मोठी कहाणी आहे. ते इयत्ता नववीत शिकत असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि त्यांच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपले. आयुष्यातील या मोठ्या आघातानंतरही त्यांनी परिस्थितीसमोर हार मानली नाही. उलट, संकटाला सामोरे जात शिक्षणाची वाट अधिक जिद्दीने धरली. नववीच्या काळातच मनाशी ठरवलेली “काहीही झाले तरी शिक्षणाच्या जोरावर आपले ध्येय साध्य करायचे” ही जिद्द त्यांनी कायम जपली.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी शैक्षणिक वाटचाल सुरू ठेवत गावात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला. या यशाने त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि मोठे ध्येय गाठण्याची प्रेरणा मिळाली. पुढील काळात सातत्य, कठोर परिश्रम, अभ्यासातील शिस्त आणि अपयश आले तरी न खचण्याची वृत्ती या जोरावर त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली.

MPSC सारख्या अत्यंत स्पर्धात्मक परीक्षेत एकाच वेळी SR & STI या दोन्ही राज्यात 16वा आणि OBC प्रवर्गात दुसरा क्रमांक मिळवणे ही त्यांच्या मेहनतीची आणि चिकाटीची पावती मानली जात आहे. विशेष म्हणजे, ज्या वयात अनेक जण परिस्थितीसमोर खचून जातात, त्या वयात रविराज यांनी परिस्थितीलाच आपल्या यशाची प्रेरणा बनवले.

त्यांच्या या यशामुळे चिखली गावातील विद्यार्थी आणि तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनीही मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, यासाठी रविराज यांची यशोगाथा निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

वडिलांचे छत्र हरपले, परिस्थितीने अनेक परीक्षा घेतल्या; मात्र रविराज यांनी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाची साथ कधी सोडली नाही. त्यामुळेच नववीत गावात प्रथम क्रमांकापासून सुरू झालेला त्यांच्या यशाचा प्रवास आज राज्यातील गुणवंतांच्या यादीत 16व्या क्रमांकापर्यंत आणि दुय्यम निबंधकपदापर्यंत पोहोचला आहे.

रविराज दत्तात्रय झेंडे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल चिखली ग्रामस्थ,संदीप ठोंबरे आणि मित्रपरिवार यांच्या तर्फे सत्कार करण्यात आला..

शिक्षक, नातेवाईक आणि विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील प्रशासकीय सेवेसाठी सर्वांकडून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या जात आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे