
दुरुस्तीसाठी आलेल्या मोबाईलच्या बॅटरीचा अचानक स्फोट झाला. सदर घटना बुधवारी (दि. १९) दुपारी १२.३० च्या सुमारास मार्केट यार्डमधील साई मोबाईल अॅण्ड अॅसेसरीज या दुकानात घडली. या घटनेने दुकानाचे मालक आणि कामगारांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. याबाबत दुकानाचे मालक सुजित कटारिया यांनी दिलेल्या माहितीनुसार एका ग्राहकाने अॅपल कंपनीचा आय-८ व्हर्जनचा मोबाईल स्पिकर दुरुस्तीसाठी दुकानात आणला होता. सदर मोबाईल टेबलवर ठेवलेला होता.
सर्व कामगार आपआपल्या कामात व्यस्त असताना बुधवारी (दि. १९) दुपारी १२.३० वा. च्या सुमारास या मोबाईलच्या बॅटरीचा अचानक स्फोट झाला.
स्फोटाचा आवाज ऐकून आणि पडलेला प्रकाश पाहून दुकानातील कामगारांची पळापळ झाली. घटना घडताच कटारिया यांनी तेथील लाईट बंद केली.
सदर घटना अचानक झाल्याने भीतीचे वातावरण तयार झाले होते. परंतु घटना घडतेवेळी मोबाईलजवळ कोणीही नसल्याने कोणालाही ईजा झाली नाही.
दुकानातील सर्वजण सुखरुप आहेत. सदर घटना ही मोबाईलला ओव्हर चार्जिंग केल्यामुळे घडल्याचे कटारिया यांनी सांगितले. संबंधित ग्राहकाने मोबाईल दुरुस्तीस आणताना ओव्हर चार्जिंग करून आणला होता. त्यामुळे बॅटरीचा स्फोट झाला.
मोबाईल धारकांनी आपला कोणत्याही कंपनीचा मोबाईल असला तरी त्यास ओव्हर चार्जिंग करू नये. साधारण दीड ते दोन तासांपेक्षा अधिक काळ मोबाईल चार्ज करू नये. फुगलेली बॅटरी असेल तर ती लगेच बदलून घ्यावी आणि होणारा अनर्थ टाळावा, असे आवाहन सुजित कटारिया यांनी केले आहे.