
अंगणवाडी सेविकांनी आपल्या मागण्यांसाठी शासनाच्या विरोधात पुकारलेल्या संपाला पूर्णविराम मिळाल्याने पुन्हा एकदा ओस पडलेल्या अंगणवाड्यांमध्ये चिमुकल्यांचा किलबिलाट सुरू झाल्याची माहिती रायगड जिल्हा प्रमुख जीविता पाटील यांनी दिली.
२५ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेत्यांची महिला बालविकासचे सचिव अनुपकुमार यादव व महिला बालविकास आयुक्त रुबल अगरवाल आणि अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विस्तृतपणे झालेल्या बैठकीमध्ये अंगणवाडी सेविकांच्या मागण्या शासनाला पूर्ण कराव्या लागल्या. यामध्ये पेन्शनची प्रमुख मागणी मान्य करीत शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेचा अंतिम प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे मान्य केले असून, लवकरात लवकर प्रस्ताव मंत्रिमंडळात मंजुरीसाठी पाठविला जाणार असल्याचे सांगितले. तसे कृती समितीच्यावतीने पेन्शन योजनेबाबत ठोस सुधारणांचा लेखी प्रस्ताव देण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ग्रॅच्युईटी देण्याचे मान्य केले असून, त्याचबरोबर अंगणवाडीच्या कामकाजासाठी गेल्या दोन वर्षांपासून मोबाईल देण्याची मागणी केली जात होती, तीही मागणी मान्य झाली आहे. मिनी अंगणवाड्यांचे मोठ्या अंगणवाडीत रूपांतर करण्याचा प्रश्न गेली कित्येक वर्ष रखडला होता, हाही प्रश्न मार्गी काढला गेला. मिनी अंगणवाडी सेविकांना पूर्ण अंगणवाडी सेविका आदेश त्वरित देणार असल्याचे मान्य केले. त्याचबरोबर संपकाळात सेविकांना बजाविण्यात आलेल्या नोटीसद्वारे अंगणवाडी सेविकांविरोधात कारवाई न करण्याची विनंतीही मान्य करून बजाविण्यात आलेल्या नोटीसा रद्द करून कारवाई न करण्याचे मान्य करण्यात आले.
कोरोना काळातील अंगणवाडी सेविकांची कामगिरी पाहता राहिलेल्या दीपावली व उन्हाळी सुट्टी ही संपकाळात समायोजित करून संपकाळातील मानधन देण्यात येणार असल्याबाबत सकारात्मक विचार करणार असल्याचे शासनाने मान्य केले, तर महिला बालाविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ५ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या बैठकीमध्ये दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आशा सेविकांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत आल्यानंतर त्याचे अवलोकन करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीचा विषय मंत्रिमंडळात मांडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
ग्रॅज्युईटी व पेन्शनचा महत्वपूर्ण प्रश्न मार्गी लागल्याने शासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे अध्यक्ष एम.ए पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, कमल परुळेकर, भगवान देशमुख, जीवन सुरुडे, जयश्री पाटील, ॲड. निशा शिवूरकर, आप्पा पाटील, आरमायटी इराणी, ॲड. माधुरी दीक्षित इत्यादींच्या एकमताने गेली दोन महिने सुरू असलेल्या संपाला पूर्णविराम मिळालेला असल्याचा माहितीही जिल्हा प्रमुख जीविता पाटील यांनी दिली.