आयुक्त साहेब अवास्तव पाणी वापरण्यावर कारवाई करा – सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा
अहिल्यानगर

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस कमी पडल्यामुळे दुष्काळ जन्य परिस्थिती निर्माण झाली असताना शहरातील नागरिक पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय करीत असल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी मा. आयुक्त अहिल्यानगर महानगरपालिका, अहिल्यानगर यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
अहिल्या शहरातील उपनगरा मध्ये अनेक कॉलनी मध्ये बंगल्या समोर नागरिक मोठ्या प्रमाणात सडा मारून तसेच गाड्या धुवून पाण्याचा अपव्यय करीत असल्याचे प्रखरतेने दिसून येते. या नागरिकांना कोणी पाण्याचा अपव्यय करू नये अशी समज दिली तरी ते ऐकत नाही या करिता महानगर पालिकेनेच जर स्कॉड नेमून या लोकांना पाण्याचा अवास्तव वापर करण्यापासून प्रतिबंद केला तर नक्कीच थोडे का होईना याची मदत दुष्काळजन्य परिस्थीतीत महानगरपालिकेला होईल.
वास्तविक पाहता अनेक महानगरपालिकेने अवास्तव पाणी वापरण्यापासून प्रतिबंद करीत पाण्याचे कनेक्शन वर मीटर लावलेले आहेत त्या मुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होते, त्याच धर्तीवर महानगरपालिकेने सुद्धा पाण्याचे कनेक्शनला मीटर लावून जितके पाणी वापरले जाईल तितकेच पाण्याचे कर आकारण्यात यावे अशी मागणीही बोज्जा यांनी केली आहे.
अनेक नागरिक त्यांच्या मालकीच्या बोअरचाही मोठी प्रमाणात पाण्याचा अनावश्यक वापर करीत असल्याने जमिनीतील भूजल पातळीही खोल गेली असल्याचे सांगण्यात येत आहे या साठी महानगरपालिकेने या बाबत गंभीर विचार करून कारवाई करावे व जरूर पडल्यास अवास्तव पाणी वापरणाऱ्यांची नावे सांगितल्यास योग्य बक्षीस दिले जाईल अशी योजनाही पालिकेने राबवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी केले आहे.




