सह्याद्री मल्टिस्टेटचे संस्थापक व आर्थिक अपहाराच्या गुन्ह्यात अटक असलेले संदीप थोरात यांचे निधन
अहिल्यानगर

सह्याद्री मल्टिस्टेटचे संस्थापक व आर्थिक अपहाराच्या गुन्ह्यात अटक असलेले संदीप थोरात यांचे नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले.
अशी माहिती नाशिकच्या जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. सह्याद्री मल्टिस्टेट (मल्टिसिटी निधी कंपनी) चे संस्थापक आणि अध्यक्ष संदीप थोरात यांना करोडो रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात अहिल्यानगर पोलिसांनी अटक केली होती. त्यांनी ‘क्लासिक ब्रिज मनी सोल्युशन’ आणि सह्याद्री कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे, ज्याची चौकशी आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.
अटकेनंतर तपासासाठी विविध ठिकाणी नेण्यात आलेल्या थोरात यांची अखेर नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली. मात्र, कारागृहातील वास्तव्यात त्यांना फुफ्फुसांचा त्रास जाणवू लागला. प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांकडून उपचार सुरू असतानाच त्यांची जीवनयात्रा संपली.
एका बाजूला कोट्यवधींच्या कथित आर्थिक घोटाळ्याचे गंभीर आरोप, तर दुसऱ्या बाजूला मृत्यूने घेतलेली अचानक कलाटणी.. संदीप थोरात यांच्या निधनामुळे या प्रकरणातील तपास, आर्थिक व्यवहार आणि गुंतवणूकदारांच्या पैशांबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.




