ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर जिल्ह्यातील 5 लाख 58 हजार मतदारांना नोटिसा

 

अहिल्यानगर जिल्ह्यातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेचा (एसआयआर) पुढील टप्पा आता निर्णायक ठरणार आहे.

या मोहिमेत पडताळणीदरम्यान मृत, स्थलांतरित, दुबार तसेच प्रत्यक्ष अस्तित्वात नसलेली अशी सुमारे 4 लाख 27 हजार 930 नावे मतदार यादीतून वगळण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. त्यानंतर 31 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे.

दरम्यान, सन 2002 च्या मतदार यादीशी जुळणी न झालेल्या तसेच मतदार यादीतील तपशीलात दुरूस्ती असलेल्या 5 लाख 58 हजार 846 मतदारांना नोटिसा बजावून आवश्यक पुरावे सादर करण्याची संधी दिली जाणार आहे.

जिल्हा निवडणूक शाखेकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, एसआयआर मोहिमेस देण्यात आलेली दुसरी मुदतवाढ संपल्यानंतर जिल्ह्यातील मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. आता प्रारूप मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर हरकती, दावे आणि पुरावे सादर करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील 38 लाख 10 हजार 109 मतदारांची डिजिटायझेशनच्या माध्यमातून पडताळणी करण्यात आली. या प्रक्रियेत 1 लाख 41 हजार 212 मतदार मृत, 1 लाख 71 हजार 719 मतदार स्थलांतरित, तर 62 हजार 707 मतदारांची नावे दुबार असल्याचे आढळून आले.

याशिवाय 50 हजार 167 मतदार प्रत्यक्षात अस्तित्वात नसल्याचे निदर्शनास आले. या सर्व बाबींची एकत्रित संख्या 4 लाख 27 हजार 930 इतकी होत असून, संबंधित नावे प्रारूप मतदार यादीतून वगळण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची मतदार संख्या आणि मतदान केंद्रांच्या रचनेतही मोठा बदल होणार आहे.

दरम्यान, मतदार यादीत नावे असली तरी सन 2002 च्या मतदार यादीशी जुळणी न झालेल्या तसेच प्रपत्र भरून दिलेल्या 5 लाख 58 हजार 846 मतदारांना पुरावे सादर करण्यासाठी नोटिसा बजावण्यात येणार आहेत. यामध्ये सुमारे 1 लाख 69 हजार 116 मतदारांनी नाव, वय, पत्ता, छायाचित्र अथवा अन्य तपशिलात दुरूस्तीची मागणी केली आहे. नोटीस मिळाल्यानंतर संबंधित मतदारांना आपले नाव आणि मतदार म्हणून अस्तित्व सिध्द करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व पुरावे सादर करता येणार आहेत. या प्रक्रियेनंतर पात्र मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

नोटिसा बजावल्यानंतर होणार्‍या सुनावणीसाठी जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांमधील 436 राजपत्रित अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित अधिकारी मतदारांकडून सादर करण्यात येणारे पुरावे आणि कागदपत्रांची छाननी करून नियमानुसार निर्णय घेणार आहेत.

त्यामुळे प्रारूप मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर पुढील काही दिवस जिल्ह्यातील मतदारांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. नोटीस प्राप्त झालेल्या मतदारांनी विहित मुदतीत आवश्यक पुरावे सादर करणे अपेक्षित आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे