
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ अंतर्गत इयत्ता बारावीच्या परीक्षांचे वेध आता विद्यार्थ्यांना लागले आहेत. अभ्यासक्रमाची अध्ययन प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना लेखी परीक्षेला सामोरे जाण्याची तयारी विद्यार्थी सध्या करतात. तर परीक्षेच्या प्रशासकीय प्रक्रियेलाही वेग आला आहे.
इयत्ता बारावीच्या फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या लेखी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे अर्थात परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. नियमित शुल्कासह येत्या ६ नोव्हेंबरपर्यंत आवेदनपत्रे कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत ऑनलाइन पद्धतीने दाखल केले जातील.
उच्च माध्यमिक शाळा- कनिष्ठ महाविद्यालयांतील कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवसाय अभ्यासक्रम या शाखांतील नियमित विद्यार्थी, तसेच सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय, आयटीआयद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी यांना आवेदनपत्रे भरायची आहेत.
विद्यार्थ्यांना त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत ही आवेदनपत्रे ऑनलाइन पद्धतीने भरता येतील. याबाबत महाविद्यालयांसाठी सविस्तर सूचना जारी केलेली आहे.