मुंबई आणि पुण्याला आज यलो अलर्ट

मोठ्या खंडानंतर राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने आजही अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. आज मुंबई आणि पुण्यालाही यलो अलर्ट देण्यात आला असून यासह राज्यातील अनेक भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर विदर्भातील काही जिल्ह्यांत देखील आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पुण्याला हवामान विभागाने यलो अलर्ट दिला असून पुण्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. राजस्थानमधून मान्सूनने माघार घेतल्याचे हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.
वास्तविक यंदा देखील मॉन्सूनचा परतीचा प्रवास हा उशिराने सुरू झाला आहे. त्याचा फटका राज्यातील पिकांना बसला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी हाताला आलेली पिके वाया गेली आहे. अशा शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे मदत देण्याची मागणी केली आहे.
जोर ओसला
मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. सध्या त्याचा जोर ओसला आहे. असे असले तरी कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरूच आहे. पुढील काही दिवस असाचा पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.