
शहराच्या काही अनेक भागात अतिवृष्टी झाल्याने रस्ते गेले पाण्याखाली दिल्ली गेटवरील वाहतूक ठप्प.
शनिवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे अहमदनगर शहरातील उड्डाणपुला खालून नदीसारखे पाणी वाहत असून, खालून जाणारी वाहतूक पूर्णपणे थांबली आहे.
पावसामुळे प्रेमदान चौक ते दिल्ली गेट मार्गे जाणारी वाहतूक थांबवण्यात आली असून, ही वाहतूक बालिकाश्रम रोड मार्गे वळवण्यात आली आहे. अतिवृष्टीच्या पावसामुळे शहरातील अनेक घरांमध्ये देखील पाणी घुसले आहे.
नगर शहर व परिसराला शनिवारी मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून, गेल्या दोन तासांत शहरातील अनेक भागात अतिवृष्टीसारखा पाऊस झाल्याने शहरांतर्गत तसेच उपनगरातील बहुतेक रस्ते पाण्याखाली गेले होते. त्यातच सुट्टीमुळे शनिवारपासून गणेश उत्सवानिमित्त साकारण्यात आलेले आरास पाहण्यासाठी बाहेर पडण्याच्या स्थितीत असलेल्या नगरकरांचा या पावसामुळे मात्र हिरमोड झाला असून, अनेक ठिकाणी गणेश मंडळाच्या पेंडालमध्ये पावसाचे पाणी आल्याने कार्यकर्त्यांची देखील तारांबळ उडाली आहे.
नगर शहरातून जाणाऱ्या प्रमुख रस्त्यावर पाणी साचल्याने या रस्त्यावरील वाहतूक देखील मंदावली होती.दरम्यान गेल्या 24 तासात नगर शहर व जिल्ह्यात 30 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
शहराच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्यामुळे शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते. या रस्त्यांतून मार्ग काढताना नगरकरांना देखील तारेवरची कसरत करावी लागली.
नगर शहरातील माळीवाडा, दिल्ली गेट, सर्जेपुरा सह अन्य परिसरात गणेश उत्सवानिमित्त विविध गणेश मंडळांनी देखावे सादर केले असून ते देखावे पाहण्यासाठी शनिवारपासून नगरकर बाहेर पडणार होते. मात्र शनिवार दुपारपासूनच पावसाला सुरुवात झाल्यामुळे बाहेर पडण्याच्या मनस्थितीत असलेल्या नगरकरांना घरातच थांबावे लागले.
नगर शहरातील काही भागात अतिवृष्टीचा पाऊस झाला असून, आतापर्यंत झालेल्या पावसापेक्षा तो अधिकचा पाऊस होता. जिल्ह्यात गेल्या 24 तासात 30 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, मुसळधार व अतिवृष्टीच्या पावसामुळे संभाजीनगर-अहमदनगर रस्त्यावरील वाहतूक मंदावली आहे.