अहिल्यानगरच्या रेल्वे प्रश्नांवर खासदार नीलेश लंके आक्रमक.

अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे विकासाला गती द्या, केवळ आश्वासन नको तर प्रत्येक प्रकल्पाची निश्चित तारीख जाहीर करा, अशी आक्रमक भूमिका खासदार नीलेश लंके यांनी रेल्वे स्थायी समितीच्या बैठकीत मांडली. पुणे-अहिल्यानगर लोकल, नवीन रेल्वे मार्ग, बंद पडलेल्या पॅसेंजर सेवा आणि प्रवासी सुविधांच्या प्रश्नांवर त्यांनी रेल्वे प्रशासनाला धारेवर धरले.
रेल्वे प्रशासनाने प्रत्येक प्रकल्पाची सद्यस्थिती, प्रगती आणि पूर्णत्वाची तारीख जाहीर करावी, मागण्या कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी लंके यांनी केली.
बैठकीत त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले –
सुरक्षिततेसाठी ‘कवच’ प्रणालीची मागणी –
अहिल्यानगर आणि दौंड-मनमाड मार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ‘कवच’ स्वयंचलित सुरक्षा प्रणाली, ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन, आरएफआयडी टॅग, ऑप्टिकल फायबर, ऑटो ब्लॉक सिग्नलिंग आणि इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणा बसवावी.
शेतकऱ्यांसाठी कार्गो टर्मिनल –
अहिल्यानगर स्थानक परिसरातील रेल्वेच्या मोकळ्या जमिनीवर गती शक्ती कार्गो टर्मिनल, शेतमाल लॉजिस्टिक हब आणि कंटेनर डेपो उभारावा. त्यामुळे कांदा, दूध, भाजीपाला वाहतुकीला चालना मिळेल. तसेच रेल्वे परिसरात किऑस्क, रिक्षा स्टँडसाठी जागा देऊन स्थानिक तरुणांना रोजगार द्यावा.
नवीन मार्गांना गती द्या –
अहिल्यानगर-पुणे, छ. संभाजीनगर-अहिल्यानगर आणि कल्याण-मुरबाड या प्रस्तावित मार्गांच्या DPR ला निश्चित कालमर्यादा जाहीर करावी. कामांचे मूल्यमापन आणि अमृत भारत योजनेच्या कामांच्या दर्जाची चौकशी करावी.
निंबळक येथील गेट क्र. ३०, विळद, वांबोरी, अरणगाव, श्रीगोंदा साखर कारखाना परिसरातील उड्डाणपूल व भुयारी मार्गांची कामे तातडीने पूर्ण करावीत.
अहिल्यानगरहून जयपूर, खाटू श्यामसाठी थेट गाडी सुरू करावी. पुणे-लखनऊ, पुणे-गोरखपूर, यशवंतपूर-चंदीगड, संपर्क क्रांती या गाड्यांना अहिल्यानगरला थांबा द्यावा. बेलवंडी, विसापूर येथे थांबे द्यावेत आणि कोरोना काळात बंद झालेल्या नांदेड-दौंड, मनमाड-पुणे, शिर्डी-मुंबई पॅसेंजर सेवा पुन्हा सुरू कराव्यात.
स्थानकातील सुविधांवर भर –
प्लॅटफॉर्म २ व ३ साठी केडगाव बाजूने स्वतंत्र इमारत व प्रवेशद्वार, लिफ्ट, एस्कलेटर, महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र प्रतीक्षालय, ड्रेनेज, दुर्गंधी, मोकाट कुत्रे व रणगाडा परिसरातील अस्वच्छता दूर करावी. आरक्षण खिडकीची वेळ सकाळी ८ ते रात्री ८ पूर्ववत करावी, अशी मागणीही खासदार लंके यांनी केली.




