ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

दिलखुलास गप्पामहाराष्ट्र

रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा – हिरकणी सौ.अनिता गुजर यांनी खुप छान लेख लिहीलाय नक्कीच वाचा

राहणार- डोंबिवली

खरच आहे ही सृष्टी विविध रंगांनी सजली आहे. तीला सजवणारा रंगारी परमेश्वर आहे. हाती कुंचला घेऊन त्याने अवघी सृष्टी रसंगीबेरंगी करून टाकली.सुर्यकिरणामध्ये सात रंग सामावलेले असतात.लाल निळा पिवळा हे त्रिमूर्ती, तीन प्रमुख रंग. याच तीन मूळ रंगांच्या मिश्रणातून अनेक रंग निर्माण होतात.

रंग हे आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे. प्रत्येक रंगांचं महत्व वेगवेगळे . तरीही त्यांना आपल्या रंगातील गुणांची घमेंड नसते. ज्याचे त्याचे स्थान ,महत्व वेगवेगळे. पण हेच सारे रंग एक झाले तर पांढरा रंग निर्माण होतो जो शांततेचा प्रतीक आहे .

आपल्या दैनंदीन जीवनात आपण रंगांशी फार निगडीत असतो. हेच पहा एक विवाहित स्त्री हळदीकुंकू हे सौभाग्याचे लेण लेते. कुंकू लाल आणि हळद पिवळी.आपल्या रक्ताचा रंग लाल.लाल रंग हा रजोगुणी रंग आहे. पिवळा रंग हा धर्माचा सात्विक रंग आहे आणि हा सत्वगुणी रंग आहे. तिच्या हातातील चुडा हिरव्यारंगाचा जो भरभराटीशी निगडीत आहे. तसेच हा रंग बुद्धिशी निगडीत आहे,यश देणारा आहे. स्त्रीच्या गळ्यातील सौभाग्याच्या पोतीचा रंग काळा. बरेच जण काळा रंग अशुभ मानतात. पण नेहमी वाईटातून चांगले शोधावे.

स्त्रीच्या पाठीवर सळसळणारी काळी वेणी तिच्या सौंदर्यात भर पाडते. लहान मुलांना नजर नको लागायला म्हणून काळा तीट लावतात. कोकिळेचा रंग काळा असला तरी ती मंजुळ स्वराने सार्यांना भुलवते. पहाट झाली की निळ्या आकाश केशरी होऊन जाते. हिरवेगार शेत डौलाने डोलू लागते. रंग हे मनुष्याला मानसीक आनंद देतात,नवचेतना देतात. या रंगांचा मोह देवांनाही झाला आणि त्यांनी आपआपल्या आवडत्या रंगांची निवड केली. कस म्हणून काय विचारता थोडा विचार करा .

गणपती बाप्पाला लाल रंगाचे जास्वंद खूप आवडते. शंकराच्या पिंडीवर हिरव्या रंगाचे बेलपत्र वाहीले जाते.जेजुरीच्या खंडेरायाला पिवळ्या रंगाच्या भंडाराची उधळण खूप आवडते. कोल्हापूरच्या ज्योतिबाच्या दारी गुलाबी रंगाच्या गुलालाची उधळण करतात.

सर्व जगाच्या विठूमाऊलीला काळ्या रंगाचा बुक्का फार आवडतो. श्री क्षेत्री गाणगापूरी असलेल्या दत्तांना सफेद रंगाचे भस्म फारच आवडते. रामभक्त मारुतीरायला शेंदरी रंगाची उटी आवडते. अशा या रंगांचा मोह देवांनासुद्धा पडला मग मनुष्याचे काय . काळ्या ढगामध्ये पांढरी वीज दाखवणाऱ्या त्या परमेश्वराचे मी रंगीबेरंगी सृष्टी निर्माण केल्याबद्दल शतशः ऋणी आहे . रंगाला माणसाच्या आयुष्यात खुप महत्व आहे .

तानापिहिनिपाजा म्हणजे – तांबडा,नारिंगी,पिवळा,हिरवा,निळा, पारवा(पांढरा) ,जांभळा.

पण प्रत्येक मुळ रंगाचा आगळा वेगळा गुणधर्म त्यावरुन मानवी स्वभावला विशेषणे दिली जातात, जशी हिरवट, काळपट, गुलाबी, रंगीन काय एक ना अनेक . दोन रंगाची सरमिसळ किंवा त्याहून अधिक रंगाचे मिश्रण करुन नवीनच रंगाचा अविष्कार होतो .तसा भिन्न भिन्न स्वभावाचे माणसाचे रंगछटा संगतीचे रंग मिसळल्याने नाना त-हा स्वभाव गुणाच्या आढळतात, मुळात तुमच्या मनाच्या विचार करण्याच्या शैलीवर तुमचे रंगढंग ठरत असतात,, वयपरत्वे त्या छटा बदलत असतात, ते नैर्सगीक आहे, परंतु तुमच्यातील मुळ रंग बदलणे तसे अवघडच, परिस्थितीनुरूप व काळानुरुप त्यात अनेक रंग येवुन मिसळतात त्यानुसार जगण्याची रंगसंगती बदलत असते.

त्यानुसार व्यक्तीमत्व व विचारसरणीही बदलत जाते.तुम्ही अनेंक रंगात रंगून तुमचा रंग वेगळा हे तत्व जपत असाल तर तुमची मुळ छटा कधीहि फिकट होत नाही. तुमच्या मनाला उभारी देणारे आविष्कार समोर आले तर ते आणखीनच गडद,ठळक होत जातात .

सुयोॅदयाचा पहाटेचा व साजंसमयीच्या सुर्यास्ताचा रंग सोनेरीच असतो .समृद्धीचा रंग.. हिरवा., शांततेचा.. पांढरा., प्रेमाचा.. गुलाबी. राग-क्रोधाचा.. लालबुंद., दु:खाचा.. काळा, बालपणाचा.. सप्तरंगी, भक्तीचा.. केशरी .असे नाना रंग जीवनात असतात. जीवनात अनेक रंगसंगती येतात न जातात . त्याप्रमाणे आयुष्याला रंगछटा कोणतिही का असेना पण ती सदाबहार असली पाहिजे .

ती काही प्रमाणात अन्य रंगसंगती करत खुलवली पाहिजे . रंग आणि माणूस यांचं गहिरं नातं आहे. निसर्गात अनेकानेक रंग आहेत. प्रत्येकाचा रुबाब वेगळा, मोहकता वेगळी. मूळ रंग कितीही असोत पण एका रंगात दुसरा मिसळून जे मिश्रण बनतं ना त्याला तोड नाही .

माणसाच्या स्वभावांनाही रंग असतात. कधी ते भडक असतात, कधी मवाळ, कधी मृदु मुलायम तर कधी दुष्ट खुनशी. त्यांच्या रंगानुसार त्यांचं वर्तन असतं. मानवी रंगांचा हा खेळ मात्र कधीतरी जिवघेणा ठरु शकतो. त्यांच्यासाठी आणि दुसर्‍यांसाठी पण! हीच माणसं सरड्यासारखी रंग बदलतात तेव्हा त्या रंग बदलाची घृणा वाटते.

माणसानं कसं नितळ असावं. पार्‍यासारखं शुद्ध.. कुणीही काही म्हणो तुमच्या मनाला तुम्हीच टवटवीत ठेवणे गरजेचे असते.मगच म्हणता येईल ना रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा..

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे