राज्यातील सर्व शाळा 5 डिसेंबरला बंद राहणार

पुणे राज्यातील शाळांसंदर्भातील विविध प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी (५ डिसेंबर) ‘शाळा बंद’ची हाक विविध संघटनांनी दिली आहे. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसह अनुदानित, विनाअनुदानित अशा सर्व प्रकारच्या शाळा बंद राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, विद्यार्थी हित लक्षात घेऊन कोणतीही शाळा बंद राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या, तसेच बंद राहणाऱ्या शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा आदेश शिक्षण संचालकांनी दिला आहे.
शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भातील (टीईटी) सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करावी. शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी, शिक्षणसेवक योजना रद्द करून नियमित वेतनश्रेणी लागू करावी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरतीप्रक्रिया तत्काळ सुरू करावी, अशा विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी विविध संघटनांनी शुक्रवारी ‘शाळा बंद’ आंदोलन पुकारले आहे.
या आंदोलनात शिक्षक, शिक्षकतेर संघटना, संस्थाचालक संघटनांचा सहभाग आहे. मात्र, काही संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिलेला नाही.




