ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

स्त्रिया-मुलींच्या अनैतिक व्यापारात गुन्हेगारी टोळी हद्दपार, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे आदेश

अहिल्यानगर

राहुरी तालुक्यासह परिसरात दहशत माजवणार्‍या आणि स्त्रिया-मुलींच्या अनैतिक व्यापारात सक्रिय असलेल्या गुन्हेगारी टोळीवर जिल्हा पोलिसांनी निर्णायक घाव घालत सहा महिन्यांसाठी हद्दपारीची कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 अन्वये आदेश जारी केले असून यामुळे राहुरी परिसरातील नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीचे वातावरण कमी होण्यास मदत होणार आहे.

टोळीचा प्रमुख बल्ली भाऊसाहेब साळवे (रा. शिंगवे नाईक, ता. अहिल्यानगर), टोळी सदस्य सतीष सुभाष विधाते (रा. ताहाराबाद, ता. राहुरी), मच्छिंद्र गोरक्षनाथ सगळगीळे (रा. टाकळीमियाँ, ता. राहुरी) व श्रीकांत उर्फ सोन्या सुरेश लहुंडे (रा. ताराहाबाद) अशी हद्दपार केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. या चौघांनी 2018 पासून राहुरी तालुक्यासह एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत संघटित स्वरूपात दरोडे, जबरी चोरी, शस्त्रांसह फिरणे, शिवीगाळ-धमक्या, तसेच स्त्री-मुलींच्या अनैतिक व्यापाराचा रॅकेट चालविणे असे गंभीर गुन्हे केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

टोळीच्या सततच्या गुन्ह्यांमुळे राहुरी व एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र दहशत पसरली होती. त्यांच्याविरूध्द तक्रार देणे, साक्ष देणे किंवा कोणतीही माहिती पोलिसांना सांगणे यास नागरिक तयार होत नव्हते. पोलिसांनी यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही टोळीच्या वर्तनात कोणताही बदल झाला नव्हता.

टोळी प्रमुख व सदस्यांवर राहुरी व एमआयडीसी पोलीस ठाण्यात जबरी चोरी, दरोड्याची तयारी, शारीरिक मारहाण, शिवीगाळ, धमक्या, स्त्रिया व मुलींच्या अनैतिक व्यापारासंबंधी गंभीर गुन्हे दाखल आहेत. राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय ठेंगे यांनी या टोळीविरूध्द हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मान्यतेनंतर अधीक्षक घार्गे यांच्याकडे पाठविला. प्रस्तावाचे परीक्षण केल्यानंतर अधीक्षक घार्गे यांनी चौघा आरोपींना अहिल्यानगर जिल्ह्यातून 6 महिन्यांसाठी हद्दपार करण्याचे आदेश जारी केले.

जिल्ह्यात शरीराविरूध्द, मालमत्तेविरूध्द, गोवंशीय कायद्याचे उल्लंघन करणार्‍या, तसेच शस्त्र बाळगून दरोडे-चोरी करणार्‍या टोळ्यांची माहिती संकलित करून त्यांच्यावर कठोर कारवाई सुरू आहे. भविष्यातही अशा सर्व गुन्हेगार टोळ्यांना हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरू ठेवणार आहोत. – सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे