ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गणपती बाप्पा विशेषमहाराष्ट्र

एकदंत कॉलनीतील श्रीकांत आडेप यांच्या घरगुती गणेशोत्सवात ‘मिशन सिंदूर’चा देखावा – शौर्यगाथा सांगणारा उपक्रम

अहिल्यानगर

भ्याड दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर – मिशन सिंदूरची कहाणी सजावटीतून जिवंत

गणेशोत्सवात प्रत्येकजण वेगवेगळ्या कल्पकतेने व भावनेने आपापले घरगुती गणपती सजवतो. मात्र, एकदंत कॉलनी येथील रहिवासी श्रीकांत आडेप यांनी साकारलेला यंदाचा देखावा आगळावेगळा ठरला आहे. ‘मिशन ऑपरेशन सिंदूर’ या देखाव्याद्वारे भारतीय लष्कर, हवाई दल व नौदलाने केलेल्या शौर्यगाथा व पाकिस्तानविरुद्ध केलेल्या लढाया यांचे प्रभावी चित्रण करण्यात आले आहे.

श्रीकांत आडेप यांनी हा देखावा श्री गणरायाच्या मूर्तीभोवती उभारला आहे. मध्यभागी तिरंगा झेंड्याच्या साक्षीने गणपती विराजमान असून भोवती टँक, युद्धनौका, फायटर जेट्स व शस्त्रास्त्रे यांच्या प्रतिकृती सजविण्यात आल्या आहेत. मिशन सिंदूरमध्ये मोलाची भूमिका बजावणाऱ्या विंग कमांडर व्योमिका सिंग (भारतीय हवाई दलातील पहिली महिला फायटर पायलट) आणि मेजर जनरल सोफिया कुरेशी (भारतीय लष्करातील वरिष्ठ अधिकारी) यांच्या भव्य कट आऊट्सने या देखाव्याला वेगळेच रूप प्राप्त झाले आहे.

या देखाव्यात भारतीय सैन्याने केलेल्या महत्त्वाच्या युद्ध मोहिमांची माहिती देणारे फलकही लावलेले आहेत.

यामध्ये – 1947–48 भारत-पाकिस्तान युद्ध – जम्मू-काश्मीरवरील हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारतीय सैन्याचा विजय. , 1965 ऑपरेशन जिब्राल्टर – पाकिस्तानच्या गुप्त कारवायांना चोख प्रत्युत्तर देत भारतीय सैन्याने दाखवलेले शौर्य., 1999 कारगिल विजय (ऑपरेशन विजय) – कारगिल युद्धात भारतीय सैन्याने मिळवलेला ऐतिहासिक विजय., 2016 सर्जिकल स्ट्राईक – उरी येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तान अधिकृत काश्मीरमध्ये घुसून केलेली धाडसी कारवाई. या फलकांवर सर्जिकल स्ट्राईक ज्या-ज्या ठिकाणी करण्यात आले त्यांची छायाचित्रे प्रदर्शित करून पाहणाऱ्यांना त्या ऐतिहासिक क्षणांची अनुभूती दिली आहे.

2025 ऑपरेशन महादेव – अलीकडील काळातील महत्त्वपूर्ण लष्करी कारवाईचे गौरवशाली चित्रण.

याशिवाय, भारताकडे असलेल्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची छायाचित्रे आणि संक्षिप्त माहितीही या देखाव्यातील फलकांवर देण्यात आली आहे. यात S-400 ट्रायम्फ मिसाईल डिफेन्स सिस्टीम, ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल, तेजस फायटर जेट, अरिहंत अणुबोट यांसारख्या सामर्थ्यशाली शस्त्रांची नावे व वैशिष्ट्ये अधोरेखित केली आहेत. त्यामुळे भारतीय सैन्याची ताकद व सज्जता स्पष्टपणे समोर येते.

विशेष म्हणजे, या देखाव्यात ‘पाहलगाम हल्ला’चे वास्तव चित्रणही करण्यात आले आहे. निर्दोष पर्यटक व यात्रेकरूंवर झालेला हा भ्याड दहशतवादी हल्ला पाहणाऱ्याच्या डोळ्यांत अश्रू आणतो. याच हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने केलेले ‘मिशन सिंदूर ऑपरेशन’ किती यशस्वी ठरले हे या देखाव्यातून ठळकपणे दाखविण्यात आले आहे.

“दहशतवादाला भारत कधीच घाबरणार नाही. आमच्यावर हल्ला केलात तर आम्हीही तितक्याच ताकदीने उत्तर देऊ शकतो, हेच सिंदूर ऑपरेशनने सिद्ध केले,” असा ठाम संदेश या देखाव्यातून देण्यात आला आहे.

श्रीकांत आडेप दरवर्षी आपल्या घरगुती गणेशोत्सवाच्या देखाव्यातून सामाजिक संदेश देण्याचा आगळावेगळा उपक्रम राबवतात. कधी पर्यावरणपूरक संदेश, कधी ऐतिहासिक घटना, तर कधी राष्ट्रभक्तीचा उत्सव – अशा विविध विषयांवर त्यांची मांडणी असते. यंदाचा ‘मिशन सिंदूर’ हा देखावा मात्र केवळ नगरकरांचेच नव्हे तर सर्वांच्या हृदयात देशभक्तीची ज्योत पेटवणारा ठरला आहे.

या देखाव्यासाठी त्यांना त्यांच्या पत्नी सपना श्रीकांत आडेप आणि मुलगी सृष्टी श्रीकांत आडेप व मित्र अमोल गाजेंगी, रोशन सुंकी, अमित असाल, अमर सादुल, ओंकार बुरगुल, ऋषिकेश दुडगु यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

 

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे