सलग सुट्यांच्या योग साधून ६० हजार पाहुण्यांचे आगमन, छत्रपती संभाजीनगरात हॉटेल, रिसॉर्ट झाले हाऊसफुल्ल

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी रविवारी (१३ आॅगस्ट) रेकाॅर्डब्रेक गर्दी झाली. पर्यटनस्थळांना तब्बल ६० हजार पाहुण्यांनी भेटी दिल्या. वेरूळ लेणी, घृष्णेश्वर मंदिरात सर्वाधिक गर्दी होती.
त्यापाठोपाठ देवगिरी किल्ल्यासह मकबऱ्यालाही पसंती दिली. जिल्ह्यातील हॉटेल, रिसॉर्ट पर्यटकांनी ‘हाऊसफुल्ल’ झाले आहेत. दिवसभरात दीड ते दोन कोटी रुपयांची उलाढाल झाली. दरम्यान, सलग चार दिवस सुट्या असल्यामुळे पर्यटनस्थळी गर्दी वाढली आहे.
जिल्ह्यातील पयर्टनस्थळे बहरली
देवगिरी किल्ला : – देवगिरी किल्ल्याला ६ हजारांवर पर्यटकांनी भेट दिली. किल्ल्यावर जाण्यासाठी झुंबड उडाली होती. किल्ल्याच्या पार्किंगमध्ये चारचाकींसह दुचाकी वाहनांची मोठी गर्दी होती. पर्यटकांना वाहने लावण्यासाठी जागा अपुरी पडली. त्यामुळे खासगी पार्किंगमध्ये वाहने उभी करण्यासाठी जादा पैसे मोजावे लागले.
वेरूळ लेणी : – वेरूळ लेणीला दिवसभरात सुमारे २० हजार पर्यटकांनी भेटी दिल्या. या पर्यटकांच्या तिकिटांच्या माध्यमातून ८ लाख रुपयांची उलाढाल झाली. पर्यटकांनी तिकीट काढण्यासाठी काउंटरवर गर्दी होती.
घृष्णेश्वर मंदिर : – बारा ज्योतिर्लिंगांपैकी वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिर आहे. घृष्णेश्वराच्या चरणी दिवसभरात २० हजार भाविक नतमस्तक झाले. दर्शनासाठी जवळपास एक किमी रांग लागली होती. दर्शनासाठी या रांगेत दीड ते दोन तास उभे राहावे लागले.
बीबी का मकबरा : – बीबी का मकबऱ्याला ५ हजारांवर पर्याटाकांनी भेट दिली. तिकीट काढण्यासाठी पर्यटकांच्या रांगा लागल्या होत्या. मकबऱ्याबाहेरील परिसरातही पर्यटकांची तुफान गर्दी दिसून आली.