ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर महानगरपालिकेत ४१ कर्मचारी उशिरा येताना आढळले, महापौर गाडे यांचा कर्मचाऱ्यांना कडक इशारा

अहिल्यानगर - महापालिकेत कडक शिस्तीची सुरुवात; महापौर ज्योतीताई गाडे यांनी घेतली कर्मचाऱ्यांची हजेरी

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर ज्योतीताई गाडे यांनी सोमवारी सकाळी महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारावर उभे राहून कर्मचाऱ्यांची उपस्थिती तपासली. या तपासणीदरम्यान सुमारे १५० कर्मचाऱ्यांपैकी ४१ कर्मचारी नियोजित वेळेनंतर कामावर येताना आढळून आले. यावेळी उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना महापौरांनी चांगलेच सुनावले आणि पुढील काळात उशिरा येणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला.

महापौर पदाची सूत्रे ६ फेब्रुवारी रोजी स्वीकारल्यानंतर तातडीने प्रशासनाची बैठक घेऊन सर्व कर्मचाऱ्यांनी वेळेवर कामावर हजर राहावे, गळ्यात ओळखपत्र असावे तसेच नागरिकांची कामे प्रामाणिकपणे पार पाडावीत, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र अनेक कर्मचारी या सूचनांचे पालन करत नसल्याचे दिसून येत असल्याने महापौरांनी स्वतःच तपासणी मोहीम हाती घेतली.

सकाळी साडेनऊ वाजता महापालिकेच्या गेटवर उभे राहून त्यांनी येणाऱ्या कर्मचाऱ्यांची नोंद घेतली. यावेळी सुमारे ४१ कर्मचारी उशिरा येताना आढळले. नागरिकांची कामे वेळेवर होत नसल्यामुळे त्यांना वारंवार महापालिकेत हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे नागरिकांचा रोष पदाधिकाऱ्यांवर व्यक्त होतो. त्यामुळे यापुढे कामचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही, असे महापौरांनी स्पष्ट केले.

“जे कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतील त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू; मात्र कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांना सोडले जाणार नाही. उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई केली जाईल आणि कोणाचीही गई केली जाणार नाही,” असा इशाराही महापौर ज्योतीताई गाडे यांनी दिला.

सकाळी साडेनऊ वाजल्यापासून महापौर ज्योतिताई गाडे या महापालिकेच्या गेटवर उभ्या राहून कर्मचाऱ्यांची उपस्थिती तपासत होत्या. भर उन्हात उभे राहून त्यांनी साडेअकरा वाजेपर्यंत कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली. यावेळी त्यांची कडक शिस्त पाहायला मिळाली. नागरिकांच्या हितासाठी पदाचा उपयोग झाला पाहिजे. जोपर्यंत मी या पदावर आहे तोपर्यंत नागरिकांना न्याय देण्याचे काम करीन, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या कामकाजाच्या शैलीत स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्यपद्धतीची झलक दिसून आली.

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे