गृहिणी एक सुपरवुमन – जागतिक महिला दिनानिमित्त एक सुंदर असा लेख..
लेखक - हिरकणी सौ.अनिता गुजर. राहणार डोंबिवली.

मुंबई हे रात्रंदिवस धावतं शहर आहे. इथल्या महिला सर्वार्थाने पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. यापैकी बऱ्याच गृहिणींचा दिवस सुरु होतो तो पहाटे ४ ला येणाऱ्या पालिकेने सोडलेल्या पाण्याचा साठा करण्याने. केवळ एक तासात येणाऱ्या या पाण्यामध्ये घरातील सर्व भांडी पाण्याने भरणे, नळात कपडे धुणे, स्वतःची आन्हिकं आटपून घेणे. त्यानंतर नवरा कामासाठी निघणार म्हणून त्याच्यासकट सगळ्यांचं जेवण बनवणे, डबे भरून देणे, घरात जर मूल असेल तर त्यांच्या शाळेची तयारी करणे, घरातील थोरामोठ्यांना हवा-नको बघणे यामध्ये तिला तब्येतीत नाश्ता करायलादेखील वेळ नसतो.
सर्व आटपेपर्यंत मूलं शाळेतून येण्याची वेळ होते. त्यांचं दुपारचं जेवण, अभ्यास, त्यांना क्लासला सोडणे – आणणे, त्यांना रोज वेगवेगळा संध्याकाळचा नाश्ता बनवणे, परत रात्रीचं गरमागरम जेवण बनवणे, भांडी घासून आवरणे आणि हे सगळं करताना तिचा दिवस संपेपर्यंत साधारण रात्रीचे १२ वाजलेले असतातच.
जमिनीला पाठ टेकण्याआधी दुसर्या दिवशीची पूर्वतयारी असतेच मनात.पण ज्या गृहिणी असतात त्याच्या बाबतीत मात्र कोणीही विचार करतच नाही. तू दिवसभर घरात बसून नक्की काय करतेस? काय, काम काय असतं गं तुला? हे वाक्य कदाचित बऱ्याच गृहिणींच्या सवयीचं असेल. कधी चिडून, कधी ओरडून, कधी ‘गंमतीत,कधी हेटाळणी म्हणून हा प्रश्न बाईला सामोरा येतो. मग बाई कधी निमूट बसते, कधी उद्वेगानं आपल्या अखंड चालणाऱ्या अदृश्य कामांचा पाढा वाचते, कधी नेमक्या शब्दांत प्रत्युत्तर देते.
पण शेवटी ‘घरी बसलेली बाई, म्हणजे काम नसलेली बाई’ हा समाजपुरुषाच्या मनातला घट्ट समज काही निवळत नाही. अजूनच गंभीर विरोधाभास काय, तर एखाद्या गृहिणीला ‘तुम्ही काय करता? असं विचारल्यावर उत्तर येतं, ‘काही नाही, घरीच असते मी!
आपल्या भवतालात हा सगळा दिनक्रम आनंदानं स्वीकारत मूकपणे राबणाऱ्या स्त्रियांशी जरा बोला. तिच्या आत साचलेलं स्वगत जरा समजून घ्या. उद्या तिच्याविषयी बोलताना, काही नाही, घरीच असते! हा वाक्यप्रयोग जरी टाळता आला तरी खूप काही साध्य होईल.
दोन हात दोन पाय असलेल्या साध्यासुध्या बाईला दहा हात असलेली ‘सूपरवूमन’म्हणून सादर करत तिचं शोषण करणं सगळ्यात आधी बंद झालं पाहिजे. एक गृहिणी म्हणून नाही तर माणूस म्हणून तिला प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे.