
गेल्या पाच वर्षांपासून पाठपुरावा करीत असलेल्या शेती महामंडळाच्या सावळीविहीर, सोनेवाडी पट्ट्यातील शेती महामंडळाच्या ५०० हेक्टर क्षेत्रावर होणारी औद्योगिक वसाहत.
सोनेवाडी परिसरातच होण्यावर बुधवारी (दि. २९) शिक्कामोर्तब झाल्याची माहिती संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी दिली आहे.
यासंदर्भात माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या संपर्क कार्यालयात गुरुवारी (दि. ३०) दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत कोल्हे बोलत होते. स्नेहलता कोल्हे व विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या प्रयत्नाने मुखमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.
या भागात एमआयडीसी होऊन मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असल्याने युवा प्रतिष्ठानच्या युवा सेवकासह शहरातील व तालुक्यातील तरुणांनी काल गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला अभिवादन करून फटाके फोडून घोषणा देत पेढे वाटून जल्लोष साजरा केला.
याबाबत विवेक कोल्हे यांनी सांगितले, की सुरुवातीला २०१८ साली तात्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी वारी, संवत्सर, सोनेवाडी येथे शेती महामंडळाची हजारो हेक्टर जागा असून या ठिकाणी औद्योगिक वसाहत करण्यात यावी, यासाठी पत्रव्यवहार सुरू केला.
त्यानंतर पाठोपाठ संजीवनी युवा प्रतिष्ठान यांनी तालुक्यातील बेरोजगार युवकांच्या वतीने सदर औद्योगिक वसाहत व्हावी, यासाठी पत्रव्यवहार व पाठपुरावा सुरू करून संबंधित जागेचे सातबारा उतारे तात्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे प्रस्ताव निवेदन सादर केले होते.