
पुणे शहरातील धनकवडी भागात बुधवारी 11 गणेश मंडळांनी एकत्रित मिरवणुकीत जो एकात्मतेचा संदेश दिला आहे तो कौतुकास्पद आहे.
भविष्यात या भागात एकच गणेश मंडळ दिसले यात शंका नाही. अशा मिरवणुकीमुळे एकता व सर्वधर्म समभावना वृध्दिगत होईल. असे मत आमदार भीमराव तापकीर यांनी व्यक्त केले.
ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांचे जोरदार स्वागत
धनकवडी येथील साईनाथ मित्र मंडळ, श्री शिव छत्रपती मित्र मंडळ, आदर्श मित्र मंडळ, फाईव्ह स्टार मित्र मंडळ, केशव मित्र मंडळ, जय महाराष्ट्र मंडळ, अखिल नरवीर तानाजी नगर मित्र मंडळ , एकता मित्र मंडळ, विद्यानगरी मित्र मंडळ, रामकृष्ण मित्र मंडळ आणि अखिल मोहन नगर मित्र मंडळ अशा 11 गणेश मंडळांनी एकत्रित येऊन देशातील सर्वात मोठी ही मिरवणूक स्वराज्य रथावर म्हणजेच ज्यात 11 गणेश मंडळांचे गणपती विराजमान करून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या सर्व मंडळांनी बाप्पाचे जोरदार स्वागत केले. ज्ञानप्रबोधिनी वाद्य आणि गोविंद बँड पथक यांचा सुंदर ढोल ताशांचा गजरात बप्पांचे जोरदार स्वागत करण्यात आले. ही मिरवणूक गुलाबनगर, धनकवडी येथून सुरू होऊन धनकवडी गाव, केशव कॉम्लेक्स, विद्यानगरी, शिवशंकर चौक ते मोहननगर येथे काढण्यात आली.
या मान्यवरांची होती उपस्थिती
या प्रसंगी मनपाचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे, वर्षा तापकीर, आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टींग चॅम्पियन सुप्रिया सुपेकर, गिर्यारोहक स्मिता घुगे व एशियन चॅम्पियनशिप सिल्व्हर मेडल विजेता पै. धनराज भरत शिर्के हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच मंडळाचे अध्यक्ष रोहित पोळ, संतोष धनकवडे, उदय जगताप, आनंद शिंदे, विजय क्षीरसागर, प्रतिक कुंभार, अभिषेक तापकीर, अनिकेत झाड, अजय इंगळे, मिलिंद काळे व सोमनाथ शिर्के उपस्थित होते. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सफाई कामगारांचा सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
भीमराव तापकरी म्हणाले, गेल्या वर्षी ९ मंडळांनी एकत्रित येऊन मिरवणूक काढली होती. परंतू या वर्षी ११ मंडळांचे कार्यकर्ते एकमेकांच्या मंडळात सहभागी झाल्याने एकतेचे वातावरण पहावयास मिळाले आहे.
विशाल तांबे म्हणाले, लोकमान्य टिळक व भाऊ रंगारी यांनी सुरू केलेली सार्वजनिक मिरवणूकीचे हे दक्षिण पुण्यातील सर्वेत्तम उदाहरण आहे.
आज पुण्यात रूजलेली ही संकल्पना भविष्यात संपूर्ण राज्यात रूजेल. पूर्वीच्या काळी एक गाव एक गणपती ही संकल्पना होती तीच पद्धत आता सार्वजनीक गणेश उत्सावात पहावयास मिळेल.
पोलिस अधिकारी मळाळे म्हणाले, हा अत्यंत चांगला उपक्रम असून एकीकरणाची भावना वाढली आहे. या मुळे ध्वनी प्रदूषण कमी झाल्यामुळे जनतेला व पोलिसांना याचा फायदा होईल. यामध्ये जवळपास ५ ते ६ हजार गणेश भक्त सहभागी झाले होते.